मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेवरुन राजकारण, सुहास कांदेंचा गंभीर आरोप

मुंबई – मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच एकनाथ शिंदे यांनी सुरक्षतेसाठी मर्यादित पोलीस कर्मचारी असावेत, अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. सुरक्षेबाबत गंभीर नसलेल्या एकनाथ शिंदे यांच्या जुन्या किस्स्याची आता नव्याने चर्चा रंगू लागली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना त्यांच्या जीवीताला धोका असतानाही त्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरक्षा नाकारली, असा आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला. या आरोपाचे सतेज पाटील यांनी खंडन केले.
सुहास कांदे म्हणाले, तत्कालीन नगरविकास मंत्री आणि तत्कालीन गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना जेव्हा नक्षलवाद्यांकडून ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यावेळी राज्याचे गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यासाठी पाठपुरावा केला होता.
पण उद्धव ठाकरेंनी त्या दिवशी सकाळी 8.30 वाजता शंभूराज देसाई यांना फोन करून सुरक्षा देऊ नका, असे सांगितले असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. एक मराठी माणूस नक्षलवाद्यांविरोधात लढत असताना त्याला ठार मारण्याची धमकी मिळत आहे. पण तरीही तुम्ही त्यांना सुरक्षा पुरवली नाही, असा सवालही कांदे यांनी उपस्थित केला आहे.




