Crime News : राजगड पोलिस चौकीच्या हद्दीत गुन्ह्यांची मालिका; नागरिकांत भीतीचं वातावरण

खेड शिवापूर : राजगड पोलिस चौकीच्या कार्यक्षेत्रात मागील दोन-तीन दिवसांत गुन्हेगारी घटनांचा अक्षरशः सिलसिला सुरू झाला असून, या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दिवसाढवळ्या घडणाऱ्या या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला लाकूड व दांडक्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच घटनेत एका व्यक्तीवर थेट कोयत्याने प्राणघातक हल्ला झाला. श्रीरामनगर (ता. हवेली) येथील पानटपरीवर ‘कोयता गँग’ने केलेला धुमाकूळही या गुन्ह्यांच्या मालिकेत भर टाकणारा ठरला. विशेष म्हणजे, हे प्रकार खेड शिवापूर पोलिस चौकीपासून अवघ्या काही अंतरावर घडले.
याच दरम्यान शनिवारी रात्री शिंदेवाडी येथे एका रिक्षाचालकावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या सलग घडणाऱ्या घटनांनी स्थानिक नागरिकांत असुरक्षिततेची भावना अधिकच गडद झाली असून, पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी पोलिस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, गस्त वाढवावी आणि कायदा-सुव्यवस्थेला वचक बसेल अशी पावलं उचलावीत, अशी मागणी केली आहे. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राजगड पोलिसांनी वेळेत कडक पावलं उचलणं गरजेचं असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.





