Vehicle sales : सप्टेंबर महिन्यात वाहनांची दमदार विक्री; कोणत्या गाड्यांना मिळाली पसंती ? पाहा आकडेवारी
Vehicle sales : सप्टेंबर २०२६ मध्ये भारतातील वाहन विक्री ३१.७ टक्क्यांनी वाढली. इलेक्ट्रिक दुचाकी आणि कारच्या विक्रीत मोठी वाढ झाली.

Vehicle sales : सप्टेंबर २०२६ मध्ये भारतातील वाहन बाजाराने दमदार कामगिरी केली. एकूण वाहनांची किरकोळ विक्री मागील वर्षाच्या तुलनेत ३१.७ टक्क्यांनी वाढली. यात दुचाकी ३३.१ टक्के, प्रवासी वाहन ३२.४ टक्के, व्यावसायिक वाहने ३८.२ टक्के आणि ट्रॅक्टर विक्री १३.९ टक्क्यांनी वाढली.
या वाढीत सर्वाधिक लक्ष इलेक्ट्रिक वाहनांकडे आहे. इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री तब्बल ८८.५ टक्क्यांनी, तर इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची विक्री ९३.८ टक्क्यांनी वाढली. इलेक्ट्रिक दुचाकींमध्ये टीव्हीएस आणि बजाजने आपली बाजारातील पकड मजबूत केली. दुसरीकडे ओला इलेक्ट्रिकची विक्री २.९ टक्क्यांनी घटली असून तिचा बाजारहिस्सा १२.६ टक्क्यांवरून ६.५ टक्क्यांवर आला.
इलेक्ट्रिक कारमध्ये टाटा मोटर्स आघाडीवर असून तिचा बाजारहिस्सा ४१ टक्क्यांवर पोहोचला. महिंद्राची स्थितीही मजबूत राहिली. मात्र, आगामी काळात वाढती स्पर्धा आणि उत्पादनांच्या किमती महत्त्वाच्या ठरणार आहेत.
वाहन बाजारासमोर काही आव्हानेही आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मागील वर्षीची विक्री आधीच मोठी होती. त्यामुळे यंदा वाढ कायम ठेवणे कंपन्यांसाठी सोपे नसेल. कच्च्या तेलाच्या किमती, ग्रामीण मागणी, कमजोर मान्सून आणि वाढता उत्पादन खर्च यांचा परिणाम होऊ शकतो.
दरम्यान, देशातील सार्वजनिक चार्जिंग केंद्रांची संख्या २०२६ च्या मध्यापर्यंत ५२,७१८ झाली आहे. मात्र चार्जर उपलब्धता, चार्जिंगचा खर्च आणि घरात चार्जर बसवण्याच्या अडचणी अजूनही कायम आहेत.





