वीस बेडची व्यवस्था ः उपचारासाठी स्थानिक खासगी डॉक्टरांची मदत मंचर- येथील उपजिल्हा रुग्णालयात करोना विलगीकरण (आयसोलेशन) कक्ष शुक्रवार (दि. 3) पासुन सुरू करण्यात आला आहे. विलगीकरण कक्षात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी स्थानिक खासगी डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंदाराणी पाटील यांनी दिली. मंचर उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केयर सेंटर विभागाच्या पहिल्या मजल्यावर कोरोना विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षाची पाहणी जिल्हा परिषदेच्या सदस्या अरुणा थोरात, सरपंच दत्ता गांजाळे, मंचर उपजिल्हा रुग्णालय सल्लागार समितीचे सदस्य जगदिश घिसे, डॉ. सुनील खिंवसरा, डॉ. सुहास कहडणे, डॉ. किरण लोखंडे,ग्रामपंचायत सदस्या माणिक गावडे यांनी केले. करोना विलगीकरण कक्षात सुमारे 20 बेड तीन रूममध्ये असून बेडमधील अंतर दोन मीटरचे ठेवण्यात आले आहे,तसेच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. करोनाबाधित रुग्ण आहे किंवा नाही, याची तपासणी करून मगच त्यास या विलगीकरण कक्षात दाखल केले जाईल, असे उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंदाराणी पाटील यांनी सांगितले. मंचर शहरातील खाजगी डॉक्टर आणि सरकारी रुग्णालयातील डॉक्टर यांच्या समन्वयाने करोना संशयित रुग्णाची तपासणी केली जाणार आहे. आंबेगाव तालुक्यात एकही करोनाबाधित रुग्ण नाही; परंतु प्रत्येकाने घराबाहेर न पडता घरीच थांबावे. सरकारच्या लॉकडाऊनला सर्वांनी सहकार्य करावे. असे आवाहन पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी केले. वडगांव काशिंबेग फाटा येथील खासगी भीमाशंकर हॉस्पिटल, घोडेगाव ग्रामीण रुग्णालय, निरगुडसर, धामणी, महाळुंगे पडवळ, तळेघर इत्यादी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि खासगी डॉक्टर संयुक्तपणे करोना संशयित रुग्णाची वैद्यकीय तपासणी करतील. गरज भासल्यास त्यास विलगीकरण कक्षात दाखल केले जाईल. -डॉ. सुरेश ढेकळे, तालुका वैद्यकीय अधिकारी