पिंपरी – शहरात विनापरवाना वृक्षतोडीच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे शहरातील वृक्षसंवर्धनास धोका निर्माण होत असून या प्रकाराला आळा घालण्यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने स्वतंत्र पथके नेमण्यात येणार आहेत. त्यामुळे वृक्षतोडीला आता चाप बसण्याची शक्यता आहे. नागरिकांना तक्रार करण्यासाठी स्वतंत्र क्रमांक देण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी दिली. भोसरी एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत बुधवारी (दि.16) 8 झाडे तोडली. तसेच, संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनसमोरील पदपथावरील फांद्या तोडण्यासाठी परवानगी घेऊन झाडे खोडापासून कापण्यात आली. बांधकाम, जाहिरात फलकांसाठी शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. खासगी जागेसह महापालिकेची झाडेही विनापरवाना तोडली जात आहेत. मोहनगर, दत्तनगर येथील महापालिकेच्या उद्यानातील अनेक झाडे तोडण्यात आली. नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास स्टेडियमच्या आवारातील झाडांची कत्तल करण्यात आली. असे प्रकार शहरात वाढतच आहेत. त्यामुळे वृक्षप्रेमी व पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. महापालिका प्रशासन या संदर्भात गांभीर्याने पावले उचलत नसल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत बोलताना अतिरिक्त आयुक्त जांभळे-पाटील म्हणाले, वृक्षतोडीच्या घटना रोखण्यासाठी उद्यान विभागाची 4 स्वतंत्र पथके तयार करण्यात येणार आहेत. हे पथक आपल्या भागातील वृक्षांची सातत्याने पाहणी करणार आहेत. वृक्षतोडीतचे प्रकार आढळल्यास त्वरीत फौजदारी गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सारथी हेल्पलाइन प्रमाणे स्वतंत्र क्रमांक जाहीर करण्यात येणार आहे.