Baramati : दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी संवेदनशील निर्णय
Baramati : दिवाळीपूर्वीच लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये अर्थसहाय्याची रक्कम जमा होत असल्याने दिव्यांगांसाठी हा दिलासादायक निर्णय आहे.

बारामती : दिव्यांग नागरिकांना आर्थिक आधार मिळावा, त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होण्यास मदत व्हावी, त्यांना सन्मानाने व स्वावलंबी जीवन जगता यावे, या उद्देशाने बारामती नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग उदरनिर्वाह भत्ता योजनेंतर्गत २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी शहरातील ६९२ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना एकूण ८३ लाख ४ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करून वितरित करण्यात येत आहे. दिवाळीपूर्वीच लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये अर्थसहाय्याची रक्कम जमा होत असल्याने दिव्यांगांसाठी हा दिलासादायक निर्णय आहे.
बारामती नगरपरिषदेच्या दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या ५ टक्के निधीतून हे अर्थसहाय्य देण्यात येत आहे. यापूर्वी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा ५०० रुपये म्हणजेच वार्षिक ६ हजार रुपये अनुदान देण्यात येत होते. मात्र, सध्याची वाढती महागाई, दिव्यांग नागरिकांच्या दैनंदिन गरजा, औषधोपचार, आरोग्यविषयक खर्च, त्यांच्या कुटुंबावर पडणारा आर्थिक भार लक्षात घेता अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुचनेनुसार घेण्यात आला. सामाजिक जाणीवेतून सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना समाजातील प्रत्येक घटकाची विशेष काळजी होती. विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग अशा सर्वच घटकांच्या प्रश्नांकडे त्यांचे विशेष लक्ष असायचे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचावा, हा त्यांचा विचार होता. हाच सर्वसमावेशक विकासाचा आणि लोककल्याणाचा विचार पुढे नेण्याच्या भूमिकेतून हा निर्णय घेण्यात आला आहे.
नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांच्या एकमताने बारामती नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव करून अनुदानाची रक्कम वाढविण्यास मंजुरी तनली. त्यानुसार प्रत्येक पात्र दिव्यांग लाभार्थ्यास दरमहा १ हजार रुपये म्हणजेच वार्षिक १२ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय अंमलात आणला आहे. यापूर्वीच्या ५०० रुपयांच्या मासिक अनुदानात दुप्पट वाढ केली आहे.
योजनेंतर्गत मागील वर्षातील पात्र ६०७ लाभार्थी आणि चालू आर्थिक वर्षात नव्याने प्राप्त झालेल्या अर्जांपैकी पात्र ठरलेल्या ८५ लाभार्थ्यांचा समावेश केला आहे. अशा एकूण ६९२ लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार असून, त्यासाठी ८३ लाख ४ हजार रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात येत आहे.
दिवंगत अजितदादांनी नेहमीच समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणाला प्राधान्य दिले. त्यांचा लोककल्याणाचा विचार आणि वारसा सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार व जय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार अर्थसहाय्य दुप्पट करण्याचा निर्णय एकमताने घेतला. ही वाढ निश्चितच त्यांच्यासाठी आधार देणारी ठरेल. दिवाळीच्या प्रारंभीच ६९२ लाभार्थ्यांच्या खात्यात अर्थसहाय्य जमा होत असल्याचा विशेष आनंद आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवणे, हीच आमची बांधिलकी आहे.
– सचिन सातव, नगराध्यक्ष, बारामती नगरपरिषदनगरपरिषदेच्या दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या ५ टक्के निधीचा नियमानुसार विनियोग करून ६९२ पात्र लाभार्थ्यांना एकूण ८३ लाख ४ हजार रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात येत आहे. अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही केली आहे. योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शक, वेळेत पोहोचविण्यास नगरपरिषद प्रशासन कटिबद्ध आहे.
– पंकज भुसे, मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषददिव्यांगांना आर्थिक आधार व सन्मानाने जगण्याचे बळ मिळावे, यासाठी महिला व बालकल्याण विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. या कामात सर्वांचे सहकार्य लाभत आहे. वाढती महागाई, औषधोपचार आरोग्यविषयक खर्च लक्षात घेता दिव्यांग बांधवांच्या अर्थसहाय्यात करण्यात आलेली वाढ त्यांच्यासाठी निश्चितच दिलासादायक ठरेल. सुनेत्रा पवार यांना अभिप्रेत असलेल्या दिव्यांग सक्षमीकरणाच्या विचारानुसार महिला व बालकल्याण विभाग कटिबद्ध आहे.
– सविता जाधव, सभापती, महिला व बालकल्याण विभाग, बारामती नगरपरिषद.





