Stock market : मान्सूनच्या अंदाजाचा शेअर बाजारावर परिणाम; सेन्सेक्स 1,092 अंकांनी कोसळला
Stock market : भारतीय हवामान विभागाने (IMD) जून ते सप्टेंबर या कालावधीत नैऋत्य मान्सूनचा पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) केवळ ९० टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Stock market : देशात यंदा मान्सून पावसाचा अंदाज सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त होताच आणि अमेरिका-इराण युद्धविरामाबाबत अनिश्चितता कायम असल्याने शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली. शुक्रवारी सेन्सेक्स तब्बल १,०९२ अंकांनी कोसळला, तर निफ्टी २४,५५० च्या खाली बंद झाला.
दिवसभरातील अखेरच्या टप्प्यात विक्रीचा जोर वाढल्याने मुंबई शेअर बाजाराचा ३० समभागांचा सेन्सेक्स १,०९२.०६ अंकांनी अर्थात १.४४ टक्क्यांनी घसरून ७४,७७५.७४ अंकांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान तो १,२७८.६९ अंकांनी घसरून ७४,५८९.११ या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३५९.४० अंकांनी म्हणजेच १.५० टक्क्यांनी घसरून २३,५४७.७५ अंकांवर स्थिरावला.
गुंतवणूकदारांचे ५.१७ लाख कोटी रुपये बुडाले –
गुरुवार, २८ मे रोजी बकरी ईद निमित्त शेअर बाजार बंद होते. तत्पूर्वी, बुधवारी बाजार बंद झाला तेव्हा ‘बीएसई’वर (BSE) सूचिबद्ध (Listed) कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ४,७०,१५,३४५.५१९ कोटी रुपये होते. मात्र, आज शुक्रवार, २९ मे रोजी बाजार बंद झाला तेव्हा हे मार्केट कॅप कमी होऊन ४,६४,९७,८१४.७८ कोटी रुपयांवर आले. याचाच अर्थ, गुरुवारच्या सुट्टीनंतर आज शुक्रवारच्या एकाच सत्रात कंपन्यांच्या बाजारमूल्यात तब्बल ५,१७,५३०.७३९ कोटी रुपयांची (सुमारे ५.१७ लाख कोटी) प्रचंड घट झाली आहे. बाजार उघडताच झालेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.
कोणते शेअर्स वाढले – घसरले ?
सेन्सेक्समधील पॉवर ग्रिड, इंटरग्लोब एव्हिएशन, एनटीपीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील आणि बजाज फायनान्स या कंपन्यांचे समभाग मोठ्या प्रमाणात घसरले. तर टेक महिंद्रा, एचसीएल टेक, लार्सन अँड टुब्रो आणि इन्फोसिस या समभागांमध्ये वाढ नोंदविण्यात आली.
एल-निनोचा प्रभाव –
भारतीय हवामान विभागाने (IMD) जून ते सप्टेंबर या कालावधीत नैऋत्य मान्सूनचा पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) केवळ ९० टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे अन्नधान्य महागाई वाढण्याची भीती गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली. एल-निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत असल्यानेही बाजारातील वातावरण नकारात्मक झाले.
तज्ज्ञांचे मत –
जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले, “मान्सूनचा कमी पावसाचा अंदाज आणि एल-निनोच्या शक्यतेमुळे अन्नमहागाई वाढेल, अशी भीती गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे बाजारात व्यापक विक्री झाली.”
दरम्यान, अमेरिका-इराण युद्धविरामाबाबत ठोस घोषणा न झाल्याने जागतिक गुंतवणूकदारांमध्येही सावध भूमिका दिसून आली. त्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) बुधवारी १,०४२.७० कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.
आशियाई बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक वाढीसह बंद झाले, तर शांघाय निर्देशांक घसरला. युरोपीय बाजारांत मात्र सकारात्मक वातावरण होते.





