Stock Market Today : ‘या’ कारणामुळे सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी तेजीत
Stock Market Today : भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी. सेन्सेक्स ८१,९११ आणि निफ्टी २५,२९९ अंकांवर बंद. परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी आणि कच्च्या तेलाच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची संपत्ती ५३,७८५ कोटींनी वाढली.

Stock Market Today : भारतीय शेअर बाजारात गुरुवारी (१२ नोव्हेंबर) सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम राहिली. मात्र, दिवसअखेर बाजारातील वाढ मर्यादित राहिली. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली खरेदी आणि कच्च्या तेलाच्या दरातील घसरण यामुळे बाजाराला आधार मिळाला. दिवसभरातील चढ-उतारानंतर सेन्सेक्स ३१.६१ अंकांनी वाढून ८१,९११.०१ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी ४४.३० अंकांची वाढ नोंदवत २५,२९९.३५ अंकांवर स्थिरावला.
मुंबई शेअर बाजाराचा ३० कंपन्यांचा सेन्सेक्स ०.०४ टक्क्यांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ५० कंपन्यांचा निफ्टी ०.१८ टक्क्यांनी वाढला. दिवसभरात सेन्सेक्सने ८२,३२५.६१ अंकांची उच्चांकी आणि ८१,५७६.१५ अंकांची नीचांकी पातळी गाठली. म्हणजेच दिवसातील नीचांकी पातळीवरून सेन्सेक्सने सुमारे ७४९ अंकांची सुधारणा केली. निफ्टीनेही २५,१४२.९५ अंकांच्या नीचांकी पातळीवरून सावरत २५,३८४.८० अंकांपर्यंत मजल मारली.
परदेशी गुंतवणूकदारांची मोठी खरेदी –
शेअर बाजारातील तेजीला परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (एफआयआय) खरेदीचा आधार मिळाला. बुधवारी परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात १२,५६३.३३ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढण्यास मदत झाली.
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतही घसरण झाली. ब्रेंट क्रूडचा दर ०.४४ टक्क्यांनी कमी होऊन प्रति बॅरल ९२.५० डॉलरवर आला. भारताला मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करावे लागते. त्यामुळे तेलाच्या किमती कमी झाल्यास देशाच्या आयात खर्चावरील दबाव कमी होण्यास मदत होते.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ५३ हजार कोटींची भर –
शेअर बाजारातील वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या एकूण संपत्तीतही वाढ झाली. ११ नोव्हेंबर रोजी बीएसईवर नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य ५,११,७४,९८६.०८ कोटी रुपये होते. गुरुवारी ते वाढून ५,१२,२८,७७१.९३ कोटी रुपयांवर पोहोचले. म्हणजेच एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ५३,७८५.८५ कोटी रुपयांची भर पडली.
बजाज फायनान्स, एसबीआयच्या शेअर्समध्ये तेजी –
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये बजाज फायनान्स, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल), बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक आणि इटर्नल यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. दुसरीकडे हिंदुस्तान युनिलिव्हर (एचयूएल), मारुती सुझुकी, पॉवर ग्रिड आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
४,६८७ शेअर्समध्ये व्यवहार –
गुरुवारी बीएसईवर एकूण ४,६८७ शेअर्समध्ये व्यवहार झाले. त्यापैकी २,५२९ शेअर्सच्या किमती वाढल्या, तर १,९२० शेअर्स घसरले. २३८ शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. तसेच १५३ शेअर्सनी वर्षभरातील सर्वोच्च पातळी गाठली, तर ४७ शेअर्स वर्षभरातील नीचांकी पातळीवर पोहोचले. सात शेअर्स अप्पर सर्किटमध्ये, तर ३९ शेअर्स लोअर सर्किटमध्ये बंद झाले.
जागतिक बाजारात संमिश्र वातावरण –
आशियाई शेअर बाजारांमध्ये गुरुवारी घसरण दिसून आली. दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई, चीनचा शांघाय कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे निर्देशांक घसरून बंद झाले. याउलट युरोपातील प्रमुख बाजारांमध्ये तेजी होती.
अमेरिकेतील शेअर बाजार बुधवारी वाढीसह बंद झाले. नॅस्डॅक निर्देशांक १.६० टक्के, एस अँड पी ५०० निर्देशांक १.३१ टक्के आणि डाऊ जोन्स निर्देशांक ०.४९ टक्क्यांनी वाढला.
जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांच्या मते, बँकिंग आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील शेअर्सची खरेदी बाजारासाठी सकारात्मक ठरली. मात्र, माहिती तंत्रज्ञान, एफएमसीजी आणि वाहन क्षेत्रातील शेअर्समध्ये नफावसुली झाली. परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी बाजाराला आधार देत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील नरमाईही अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक आहे. मात्र, अमेरिकेतील महागाई आणि जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अस्थिरतेमुळे बाजारातील तेजीवर मर्यादा येत आहेत.






