Stock Market : ‘या’ कारणामुळे शेअर बाजारात घसरण; गुंतवणूकदारांचे एका दिवसात ₹2.5 लाख कोटींचे नुकसान
Stock Market : शेअर बाजारात मंगळवारी मोठी घसरण झाली. Sensex 388 अंकांनी घसरून 78,154 वर, तर Nifty 112 अंकांनी घसरून 24,471 वर बंद झाला. गुंतवणूकदारांचे 2.52 लाख कोटींचे नुकसान झाले.

Stock Market : कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि भू-राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात मंगळवारी (11 ऑगस्ट) मोठी घसरण झाली. विक्रीच्या दबावामुळे प्रमुख निर्देशांक लाल चिन्हात बंद झाले. सेन्सेक्स 388.19 अंकांनी घसरून 78,154.25 वर, तर निफ्टी 112.10 अंकांनी घसरून 24,471.70 वर बंद झाला.
दिवसभराच्या व्यवहारात बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. Sensex एका टप्प्यावर 494.18 अंकांनी घसरून 78,048.26 पर्यंत खाली आला. तर Nifty 154.55 अंकांनी घसरून 24,429.25 पर्यंत पोहोचला.
बाजारातील घसरणीमागे कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ हा प्रमुख घटक ठरला. ब्रेंट क्रूडची किंमत 90 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्याने भारताच्या आयात खर्चाबाबत चिंता वाढली. याशिवाय अमेरिकेच्या धोरणांबाबतची अनिश्चितता, रुपयातील कमजोरी आणि जागतिक बाजारातील मिश्र संकेतांचाही भारतीय बाजारावर परिणाम झाला.
गुंतवणूकदारांचे 2.52 लाख कोटींचे नुकसान –
बाजारातील घसरणीचा थेट परिणाम गुंतवणूकदारांच्या संपत्तीवर झाला. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मागील सत्राच्या तुलनेत सुमारे 2.52 लाख कोटी रुपयांनी घटले.
मागील सत्राच्या तुलनेत बाजारातील विक्रीचा दबाव वाढल्याने मोठ्या प्रमाणात शेअर्समध्ये घसरण झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या एकूण संपत्तीत मोठी घट झाली.
FMCG, मेटल आणि रिअल्टी शेअर्सवर दबाव
क्षेत्रनिहाय व्यवहार पाहता FMCG, मेटल आणि रिअल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी विक्री झाली. या क्षेत्रांचे निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक घसरले.
त्याचबरोबर प्रायव्हेट बँक आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्येही अर्ध्या टक्क्यांहून अधिक घसरण झाली. एकूण 16 प्रमुख क्षेत्रांपैकी 10 क्षेत्रांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाल्याचे बाजारातील आकडेवारीवरून दिसून आले.
Sensex मधील मोजकेच शेअर्स तेजीत –
Sensex मधील 30 कंपन्यांपैकी केवळ काही शेअर्समध्ये तेजी राहिली. Eternal (Zomato), Infosys आणि Titan यांसारख्या शेअर्समध्ये वाढ झाली. दुसरीकडे UltraTech Cement, Axis Bank आणि IndiGo यांच्यावर विक्रीचा दबाव राहिला.
दरम्यान, व्यापक बाजारात चित्र तुलनेने मिश्र राहिले. मिडकॅप शेअर्समध्ये विशेष हालचाल झाली नाही, तर स्मॉलकॅप शेअर्समध्ये किंचित तेजी दिसून आली.
बाजारात अस्थिरता कायम –
मंगळवारच्या व्यवहारातून पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमती आणि भू-राजकीय घडामोडींचा भारतीय शेअर बाजारावर होणारा परिणाम स्पष्ट झाला. भारत हा मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करणारा देश असल्याने तेलाच्या किमती वाढल्यास महागाई, आयात खर्च आणि कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.
त्यामुळे आगामी काळात कच्च्या तेलाच्या किमती, रुपयाची हालचाल, जागतिक बाजारातील संकेत आणि भू-राजकीय परिस्थिती यावर गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे.





