शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्सने घेतली 700 अंकांची उसळी, अवघ्या मिनिटात गुंतवणूकदार झाले मालामाल

Share Market: भारतीय शेअर बाजारात आज (4 फेब्रुवारी) तेजी पाहायला मिळत आहे. आज सकाळी सेन्सेक्सने जवळपास 700 अंक, तर निफ्टी50 ने 200 अंकांची उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले. बाजार उघडल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच गुंतवणूकादारांच्या संपत्तीत जवळपास 4.5 लाख कोटी रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले.
अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारात घसरण दिसून आली होती. सोमवारी सेन्सेक्स 319 अंकांनी कमी होऊन 77,186 अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी 121 अंकांनी म्हणजे 0.52 टक्क्यांनी कोसळून 23,361 अंकावर बंद झाला होता. आज सेन्सेक्स मागील बंद स्तर 77,186.74 च्या तुलनेत 77,687.60 वर उघडला. तर निफ्टी 50 मागील बंद स्तर 23,361.05 च्या तुलनेत 23,509.90 वर उघडला.
सकाळी 9:50 वाजता सेन्सेक्स 715 अंकांनी (0.93%) वाढून 77,902.25 अंकांवर, तर निफ्टी 50 इंडेक्स 203 अंकांनी (0.87%) वाढून 23,563.80 अंकांवर व्यवहार करत होता. बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये 1.38 टक्के आणि बीएसई स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 1.10 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.
मेटल, ऑटो आणि पीएसयू बँकेच्या शेअर्सच्या किंमतीत वाढ दिसून आली आहे. टाटा मोटर्स, एलअँडटी, इन्फोसिस, स्टेट बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, अदानी पोर्ट्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
शेअर बाजारात अचानक तेजी येण्याचे कारण काय?
जागतिक बाजाराचा प्रभाव देशांतर्गत बाजारावर दिसून येत आहे. अमेरिकाच्या व्यापार धोरणात अचानक बदल झाल्यामुळे जपानचा निक्केई, कोरियाचा कोस्पी आणि हाँगकाँगचा हँगसेंग या प्रमुख आशियाई इंडेक्समध्ये उसळी पाहायला मिळाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे.
ट्रम्प यांनी मेक्सिको-कॅनडावर 25 टक्के कर लादण्याच्या निर्णयाला स्थगित दिली आहे. अमेरिकेने 30 दिवसांसाठी हा निर्णय स्थगित करण्यास सहमती दर्शवली आहे. याशिवाय, आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कपात केली जाऊ शकते. याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे.





