Stock Market : ‘या’ कारणामुळे आज सेन्सेक्स 1502 अंकांनी उसळला; निफ्टी 25819 वर
Stock Market : भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी. सेन्सेक्स १,५०२ अंकांनी तर निफ्टी ४६९ अंकांनी वाढला. परदेशी गुंतवणूक आणि कच्च्या तेलाच्या दरातील घसरणीचा बाजाराला आधार.

Stock Market : भारतीय शेअर बाजारात बुधवारी (२५ नोव्हेंबर) जोरदार तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १,५०२.२९ अंकांनी (१.८२ टक्के) वाढून ८३,९३८.२८ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४६९.६० अंकांनी (१.८५ टक्के) वधारून २५,८१९.२५ अंकांवर पोहोचला.
परदेशी गुंतवणूकदारांकडून झालेली खरेदी, कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्सना मिळालेली मागणी यामुळे बाजारात तेजी आली.
सेन्सेक्सने दिवसभरात २,०६२ अंकांची झेप घेत ८४,४९८.२१ अंकांची उच्चांकी पातळी गाठली होती. निफ्टीनेही व्यवहारादरम्यान २५,९५१.६५ अंकांपर्यंत मजल मारली.
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरचा शेअर सर्वाधिक ५.९४ टक्क्यांनी वाढला. ट्रेंट, आयसीआयसीआय बँक, इंडिगो, एचडीएफसी बँक आणि बजाज फायनान्स यांच्या शेअर्समध्येही चांगली वाढ झाली. मात्र, टाटा स्टील, भारती एअरटेल आणि टायटनचे शेअर्स घसरले.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ –
एका व्यवहार दिवसापूर्वी म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२६ रोजी बीएसईवर (BSE) सूचीबद्ध असलेल्या सर्व समभागांचे (शेअर्सचे) एकूण बाजार भांडवल (मार्केट कॅप) ₹५,०९,७५,४९९.६८ कोटी होते. आज म्हणजेच २५ नोव्हेंबर २०२६ रोजी ते वाढून ₹५,१२,४६,१०७.३७ कोटींवर पोहोचले आहे. याचाच अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज ₹२,७०,६०७.६९ कोटींची वाढ झाली आहे.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतही किंचित घट झाली. ब्रेंट क्रूडचा दर ०.१९ टक्क्यांनी कमी होऊन प्रति बॅरल ९१.३८ डॉलरवर आला. दरम्यान, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारी भारतीय शेअर बाजारात ५,६७२.९९ कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली होती.
आशियातील बाजार मात्र घसरणीसह बंद झाले. दक्षिण कोरियाचा कोस्पी ६.१६ टक्के, जपानचा निक्केई २.७८ टक्के, शांघाय बाजार २.०३ टक्के आणि हाँगकाँगचा हँगसेंग १.१४ टक्क्यांनी घसरला. तरीही भारतीय बाजाराने या नकारात्मक वातावरणाकडे दुर्लक्ष करत जोरदार वाढ नोंदवली.
सोमवारी सेन्सेक्स १,४८३.७२ अंकांनी आणि निफ्टी ४५०.९५ अंकांनी घसरला होता. मंगळवारी गुरुनानक जयंतीनिमित्त शेअर बाजार बंद होता. त्यानंतर बुधवारी झालेल्या खरेदीमुळे बाजाराने मागील दिवसाची मोठी घसरण भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे.





