Stock Market : ‘या’ कारणामुळे आज शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 876 अंकांनी कोसळला
Stock Market : भारतीय शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 876 अंकांनी घसरून 73,852.90 वर, तर निफ्टी 22,888.95 वर बंद झाला.

Stock Market : सलग दोन दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला असून आज भारतीय शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण झाली. खासगी बँकांच्या शेअरमध्ये झालेल्या विक्रीमुळे सेन्सेक्स 876.37 अंकांनी घसरला. निफ्टीही 22,900 अंकांच्या खाली बंद झाला. जागतिक बाजारातील कमजोर संकेतांचाही भारतीय बाजारावर परिणाम झाला.
30 शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स 876.37 अंकांनी म्हणजेच 1.17 टक्क्यांनी घसरून 73,852.90 अंकांवर बंद झाला. दिवसभरात सेन्सेक्स 1,020.73 अंकांनी घसरून 73,708.54 अंकांपर्यंत खाली आला. तर 50 शेअर्सचा एनएसई निफ्टी 257.20 अंकांनी म्हणजेच 1.11 टक्क्यांनी घसरून 22,888.95 अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये अॅक्सिस बँकेच्या शेअरमध्ये 3.85 टक्क्यांची घसरण झाली. कंपनीचा जुलै-सप्टेंबर तिमाहीतील एकत्रित निव्वळ नफा 39.4 टक्क्यांनी वाढून 7,704.67 कोटी रुपये झाला आहे. तरीही गुंतवणूकदारांकडून शेअरची मोठी विक्री झाली.
अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस, बजाज फायनान्स, ट्रेंट, एनटीपीसी आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्सही घसरले. तिमाही निकाल गुंतवणूकदारांच्या अपेक्षेनुसार नसल्याने एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्येही 2 टक्क्यांहून अधिक घसरण झाली.
दुसरीकडे अदानी पोर्ट्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, एलअँडटी, इंटरग्लोब एव्हिएशन आणि मारुती सुझुकीच्या शेअर्समध्ये वाढ झाली.
जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांच्या मते, जागतिक बाजारातील कमजोर संकेत आणि खासगी बँका व आयटी कंपन्यांच्या शेअर्समधील विक्रीमुळे बाजारावर दबाव आला. तिमाही निकाल आणि नफ्याच्या मार्जिनबाबतच्या चिंतेमुळे खासगी बँकांच्या शेअर्समध्ये दबाव राहिला.
दरम्यान, शुक्रवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) भारतीय शेअर बाजारात 1,165.92 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
जागतिक बाजारातही संमिश्र स्थिती होती. युरोपातील बाजार घसरणीसह व्यवहार करत होते. शुक्रवारी अमेरिकेतील नॅस्डॅक 2.14 टक्के, एसअँडपी 500 निर्देशांक 1.09 टक्के आणि डाऊ जोन्स 0.34 टक्क्यांनी घसरला होता. दरम्यान, ब्रेंट कच्च्या तेलाचा दर 1.07 टक्क्यांनी घसरून 108.7 डॉलर प्रति बॅरल झाला आहे.





