Stock Market : शेअर बाजारात पाच दिवसांच्या तेजीला ब्रेक; ‘या’ कारणांमुळे सेन्सेक्स 607 अंकांनी घसरला
Stock Market : सलग पाच सत्रांच्या जोरदार तेजीला शुक्रवारी ब्रेक लागला. आयटी क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावरील विक्रीमुळे आणि वाढलेल्या भू-राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात नफावसुलीचे वातावरण दिसून आले.

Stock Market : सलग पाच सत्रांच्या जोरदार तेजीला शुक्रवारी ब्रेक लागला. आयटी क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावरील विक्रीमुळे आणि वाढलेल्या भू-राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात नफावसुलीचे वातावरण दिसून आले. परिणामी, बीएसई सेन्सेक्स 607.08 अंकांनी घसरून 76,802.90 वर बंद झाला, तर निफ्टी 154.90 अंकांच्या घसरणीसह 24,013.10 वर स्थिरावला. (Stock Market)
दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्सने तब्बल 940.26 अंकांची घसरण नोंदवत 76,469.72 या नीचांकी पातळीपर्यंत मजल मारली होती. मागील पाच व्यवहार सत्रांमध्ये सेन्सेक्सने 3,577.43 अंकांची, तर निफ्टीने 1,006.40 अंकांची वाढ नोंदविली होती.
आयटी शेअरवर मोठा दबाव – (Stock Market)
जागतिक आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी Accenture ने चालू आर्थिक वर्षातील महसूल वाढीचा अंदाज कमी केल्याने भारतीय आयटी शेअरवर मोठा दबाव आला. सेन्सेक्समधील इन्फोसिसचा शेअर 6.69 टक्क्यांनी घसरला. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) 3.53 टक्के, एचसीएल टेक 2.74 टक्के आणि टेक महिंद्रा 2.45 टक्क्यांनी घसरले. परिणामी बीएसई आयटी निर्देशांकात 3.57 टक्क्यांची घसरण झाली.
याशिवाय एचडीएफसी बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांच्या शेअरमध्येही घसरण झाली. दुसरीकडे इटर्नल, भारती एअरटेल, पॉवर ग्रिड आणि एनटीपीसी यांच्या शेअरनी वाढ नोंदवली.
शांतता कराराला धक्का ? (Stock Market)
दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील प्रस्तावित चर्चेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली अनिश्चितता देखील बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम करणारी ठरली. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांचा स्वित्झर्लंड दौरा पुढे ढकलण्यात आल्याने शांतता प्रक्रियेबाबतच्या अपेक्षांना धक्का बसल्याचे बाजार विश्लेषकांचे मत आहे.
तज्ज्ञांचे मत – (Stock Market)
‘एनरिच मनी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पोनमुडी आर. यांनी सांगितले की, सलग पाच दिवसांच्या तेजी नंतर गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले. भू-राजकीय घडामोडी आणि आयटी क्षेत्रातील कमजोरीमुळे बाजारावर दबाव निर्माण झाला.
JIO आयपीओसाठी मसुदा कागदपत्रे दाखल करण्यास मंजुरी – (Stock Market)
दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या डिजिटल आणि दूरसंचार क्षेत्रातील उपकंपनी जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडच्या संचालक मंडळाने आयपीओसाठी मसुदा कागदपत्रे दाखल करण्यास मंजुरी दिली आहे. रिलायन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत ही माहिती दिली.
जागतिक बाजाराची स्थिती – (Stock Market)
आशियाई बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक किरकोळ घसरणीसह बंद झाला, तर जपानचा निक्केई निर्देशांक वाढीसह बंद झाला. युरोपीय बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण दिसून आले. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) गुरुवारी 1,025.20 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केल्याची माहिती शेअर बाजाराकडून देण्यात आली.





