Share Market Closing : शेअर बाजारात घसरण सुरूच; सेन्सेक्स 495 अंकांनी घसरला, निफ्टी 24750 च्या खाली

Share Market Closing 17 Oct : शेअर बाजारातील घसरणीचा कल थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. गुरुवारी, फ्युचर्स ट्रेडिंगच्या साप्ताहिक समाप्तीच्या दिवशी, प्रमुख बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी लाल रंगात बंद झाले. परकीय भांडवल सतत काढून घेतल्याने प्रमुख शेअर बाजार निर्देशांक घसरले. रिअल्टी, ऑटो, कंज्यूमर डिस्क्रेशनरी आणि कंज्यूमर ड्यूरेबल शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे बाजारात नकारात्मक वातावरण होते.
गुरुवारी बीएसई सेन्सेक्स 494.75 अंकांनी किंवा 0.61 टक्क्यांनी घसरून 81,006.61 वर बंद झाला. दिवसाच्या व्यवहारात तो 595.72 अंकांनी किंवा 0.73 टक्क्यांनी घसरून 80,905.64 वर आला. NSE निफ्टी 221.45 अंकांनी किंवा 0.89 टक्क्यांनी घसरून 24,749.85 वर आला. डॉलरच्या तुलनेत रुपया पाच पैशांनी घसरून 84.07 वर आला.
सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी नेस्ले 3 टक्क्यांहून अधिक घसरले. FMCG कंपनीने सप्टेंबर 2024 ला संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात 0.94 टक्क्यांची घट नोंदवली आहे. कंपनीचा निव्वळ नफा 899.49 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आपल्या प्रमुख ब्रँड्सना मागणी नसल्यामुळे आणि वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे कंपनीला या परिस्थितीचा सामना करावा लागला.
महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, टायटन, मारुती, ॲक्सिस बँक आणि टाटा स्टील या कंपन्यांचे गुरुवारी मोठे नुकसान झाले. दुसरीकडे टेक महिंद्रा, इन्फोसिस, पॉवर ग्रिड, लार्सन अँड टुब्रो आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स सर्वाधिक वधारले. एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) बुधवारी 3,435.94 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.
आशियाई बाजारात सेऊल, टोकियो, शांघाय आणि हाँगकाँगमध्ये घसरण दिसून आली. मध्य सत्रातील सौद्यांमध्ये युरोपियन बाजार तेजीसह व्यवहार करताना दिसले. बुधवारी अमेरिकन बाजार सकारात्मक क्षेत्रात बंद झाले होते.
जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.27 टक्क्यांनी वाढून $74.42 प्रति बॅरलवर पोहोचले. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण होऊन बीएसई सेन्सेक्स 318.76 अंकांनी किंवा 0.39 टक्क्यांनी घसरून 81,501.36 अंकांवर बंद झाला होता. त्याच वेळी निफ्टी 86.05 अंकांनी किंवा 0.34 टक्क्यांनी घसरून 24,971.30 अंकांवर बंद झाला होता.




