Share Market: बुधवार, १८ फेब्रुवारी भारतीय शेअर बाजारात आज कमालीची अस्थिरता पाहायला मिळाली असली, तरी सलग तिसऱ्या दिवशी बाजार ‘हिरव्या निशान’मध्ये बंद झाला. बँकिंग, मेटल आणि एफएमसीजी शेअर्समध्ये शेवटच्या तासात झालेल्या जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने दिवसातील उच्चांकी पातळी गाठली. आजच्या व्यवहारामुळे बीएसई (BSE) मध्ये सूचिबद्ध कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये १.७८ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बाजारची स्थिती: सेन्सेक्स ८३,७०० च्या पार – सकाळच्या सत्रात विक्रीचा दबाव असल्याने निफ्टी २५,६४५ अंकांपर्यंत घसरला होता. मात्र, दुपारनंतर चित्र पालटले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स २८३.२९ अंकांनी (०.३४%) वधारून ८३,७३४.२५ वर बंद झाला. निफ्टी ९३.९५ अंकांनी (०.३७%) वधारून २५,८१९.३५ वर स्थिरावला. मिडकॅप आणि स्मॉलकॅपची बाजी – लार्जकॅप शेअर्सच्या तुलनेत आज ब्रॉडर मार्केटमध्ये अधिक उत्साह दिसला. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये प्रत्येकी ०.५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. एकूण ४,३८३ शेअर्समध्ये व्यवहार झाले, ज्यापैकी २,२४३ शेअर्स वधारले तर १,९५२ शेअर्समध्ये घसरण झाली. विशेष म्हणजे, ११२ शेअर्सनी आज ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. क्षेत्रीय कामगिरी: आयटी वगळता सर्व क्षेत्रात तेजी – आजच्या व्यवहारात केवळ आयटी (IT) क्षेत्रात घसरण पाहायला मिळाली. एआय (AI) मुळे होणारे बदल आणि मार्जिनच्या चिंतेमुळे आयटी इंडेक्स १.२ टक्क्यांनी घसरला. दुसरीकडे मेटल, एफएमसीजी आणि पीएसयू बँकांमध्ये १ टक्क्यापर्यंत तेजी राहिली. नफा देणारे प्रमुख शेअर्स (Top Gainers): टाटा स्टील (२.९०%), आयटीसी, ॲक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि महिंद्रा अँड महिंद्रा. तोट्यात राहिलेले शेअर्स (Top Losers): टेक महिंद्रा (१.५८%), इटरनल, इन्फोसिस, अदानी पोर्ट्स आणि एचसीएल टेक. जागतिक संकेत आणि रुपयाची स्थिती – जागतिक बाजारात जपानचा निक्केई १ टक्क्याने वधारला, तर चीन आणि हाँगकाँगचे बाजार सुट्ट्यांमुळे बंद होते. कच्च्या तेलाचा (ब्रेंट क्रूड) भाव ६७.६४ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. भारतीय रुपया देखील आज ५ पैशांनी वधारून ९०.६७ प्रति डॉलरवर बंद झाला. “स्थानिक सकारात्मक संकेतांनी जागतिक अनिश्चिततेवर मात करण्यास मदत केली. बँकिंग क्षेत्रातील मालमत्तेची गुणवत्ता स्थिर राहण्याच्या अपेक्षेने या सेक्टरमध्ये मजबूती दिसून आली,” असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी स्पष्ट केले.