शेअर बाजारात पडझड सुरुच, गुंतवणुकदारांचे 4.53 लाख कोटी बुडाले; घसरणीचे ‘हे’ आहे कारण

Share Market Crash: शेअर बाजारात यावर्षीच्या सुरुवातीपासूनच मोठी घसरण पाहायला मिळत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला देखील बाजारात मोठी पडझड झाल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी बाजार घसरणीसह उघडला.
बेंचमार्क इंडेक्स असलेला सेन्सेक्स आज सकाळी 798.34 अंकांनी घसरून 76,580.57 वर व्यवहार करत होता. सेन्सेक्समध्ये 1.03 टक्क्यांनी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. तर निफ्टीमध्ये 246.35 अंक/1.05 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. या घसरणीसह निफ्टी 23,185.15 अंकांवर व्यवहार करत होता. या घसरणीचा सर्वाधिक फटका पीएसयू बँक आणि रिएल्टी स्टॉक्सला बसला आहे.
आजच्या बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना 4.53 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 225.14 लाख रुपयांवर आले. आज सकाळी निफ्टी रिएल्टी इंडेक्समध्ये 2 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. तसेच, निफ्टी पीएसयू बँक, मेटल, ऑटो आणि एफएमसीजी सेक्टरवरही याचा परिणाम दिसून आला. त्या तुलनेत आयटी सेक्टरमध्ये कमी घसरण दिसून आली.
शेअर बाजारात घसरण होण्याचे कारण काय?
यावर्षीच्या सुरुवातीपासूनच भारतीय शेअर बाजारात घसरून दिसून येत आहे. जागतिक बाजारातील घडामोडींचा थेट भारतीय बाजारावर परिणाम दिसून येत आहे. अमेरिकेतील रोजगाराचा डेटा समोर आला आहे. यामध्ये बेरोजगारीचा दर कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात न करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
याशिवाय, डॉलरच्या तुलनेत रुपयाने आतापर्यंतची सर्वात निच्चांकी पातळी गाठली आहे. सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 86.53 वर पोहोचला. परकीय गुंतवणुकदारांकडूनही मोठ्या प्रमाणात विक्री सुरूच आहे. तसेच, क्रूड ऑइलच्या किंमतीतही वाढ झाली आहे. या सर्वाचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून येत आहे. पुढेही बाजारात घसरण पाहायला मिळू शकते, अशी शक्यताही तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.





