Akola News : खळबळजनक ! अकोल्यात वंचितच्या महिला नेत्याच्या नातीचं अपहरण

अकोला : अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या एका माजी बड्या महिला नेत्याच्या नातीचं अपहरण करण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
अकोल्यातील वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्ष मंदाताई वाकोडे यांच्या नातीचं अपहरण झालं आहे. शहरातील कृषीनगर भागातल्या एका नामांकित इंग्लिश स्कूल परिसरातून या 12 वर्षीय मुलीच अपहरण झालं आहे. या अपहरण प्रकरणात अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली. तसेच वंचितचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेदेखील पोलीस ठाण्यात जमा झाले. यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुलीच्या शोधात पोलिसांची दोन पथक तयार करण्यात आले आणि तापासासाठी तातडीने रवाना करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी 5-6 संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.





