सीपीआय(एम)चे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन; वैयक्तिक आयुष्य, राजकीय कारकीर्द… जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी

नवी दिल्ली – देशातील ज्येष्ठ डावे नेते सीताराम येचुरी यांचे निधन झाले. वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय-एम) राष्ट्रीय महासचिव येचुरी हे दिल्ली एम्समध्ये दीर्घकाळ व्हेंटिलेटरवर होते. छातीत संसर्ग झाल्यामुळे त्यांना 19 ऑगस्ट रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. कॉम्रेड सीताराम येचुरी हे भारतातील आघाडीच्या डाव्या नेत्यांपैकी एक होते. पक्षाचे वर्चस्व कमी होत असतानाही येचुरी यांनी सीपीआय(एम) सोडले नाही. सर्व आव्हानांना न जुमानता लाल झेंडा फडकवण्याची जबाबदारी त्यांनी पूर्ण झोकून देऊन सांभाळली.
जन्म आणि बालपण –
सीताराम येचुरी यांचा जन्म 12 ऑगस्ट 1952 रोजी चेन्नई (तत्कालीन मद्रास), तामिळनाडू येथे झाला. ते हैदराबादमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले, त्यांचे वडील अभियंता तर आई गृहिणी होत्या.
शिक्षण –
सीताराम येचुरी यांनी त्यांचे शालेय शिक्षण हैदराबादमध्ये पूर्ण केले. अर्थशास्त्रातील त्यांच्या पदवीपूर्व शिक्षणासाठी त्यांनी सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली येथे प्रवेश घेतला. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली. जेएनयू येथेच ते राजकारणात सक्रिय झाले.
जेएनयू अन् राजकारण –
येचुरी जेएनयूमध्ये असताना विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाले. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) अर्थात CPI(M) ची विद्यार्थी शाखा असलेल्या स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) मध्ये सहभागी झाले.
आणीबाणीला प्रखर विरोध –
येचुरी यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीला (1975-77) प्रखर विरोध केला. यामुळेच त्यांना अटक झाली आणि तुरुंगवासही भोगावा लागला होता.
येचुरींचा राजकीय प्रवास –
येचुरी 1975 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) सदस्य बनले. गेल्या अनेक दशकांमध्ये त्यांनी पक्षामध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. 1984 मध्ये त्यांना प्रथम पक्षाच्या केंद्रीय समितीत स्थान मिळालं.
2015 मध्ये, सीताराम येचुरी यांची सरचिटणीस म्हणून निवड झाली, प्रकाश करात यांच्यानंतर त्यांनी पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम केले. पक्षाची ध्येय-धोरणे आखण्याची महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली.
संसदीय कारकीर्द –
येचुरी यांनी 2005 ते 2017 या कालावधीत पश्चिम बंगालचे प्रतिनिधीत्व करत राज्यसभेत खासदार म्हणून काम केले. भारतीय संसदेत डाव्या आणि समाजवादी धोरणांना चालना देण्यासाठी त्यांच्या स्पष्ट भाषणांसाठी आणि प्रयत्नांसाठी ते ओळखले जात. येचुरी हे कामगारांचे हक्क, कृषी सुधारणा, धर्मनिरपेक्षतेचे समर्थक आणि साम्राज्यवादाचे विरोधक होते.
वैयक्तिक जीवन –
येचुरी यांचा विवाह पत्रकार सीमा चिश्ती यांच्याशी झाला. 2021 मध्ये त्यांचा मुलगा आशिष येचुरी याचा कोव्हीड आजारामध्ये मृत्यू झाला.

