नाशिक: नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी गुरुवारी (१३ नोव्हेंबर) अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. नाशिक येथील वसंत स्मृती कार्यालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. कोतवाल यांच्यासोबतच माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, माजी नगरसेविका नंदिनी बोडके, युवा नेते नरेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव गोवर्धने आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. या महत्त्वपूर्ण प्रवेशामुळे नाशिक आणि विशेषतः चांदवड तालुक्यात भाजपला मोठे राजकीय बळ प्राप्त झाल्याचे मानले जात आहे. “हा तुमचा शेवटचा पक्षप्रवेश असेल” – मंत्री गिरीश महाजन यावेळी बोलताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिरीषकुमार कोतवाल यांचे पक्षात स्वागत केले. “शिरीषभाऊ, आजपासून तुम्ही अधिकृतपणे भाजपवासी झाला आहात. देशाच्या मुख्य राजकीय प्रवाहात तुम्ही सामील झाला आहात. आता यापुढे कुठेही जाण्याची वेळ येणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “भाजपमध्ये तुम्हाला काम करण्यासाठी मोठा वाव असून, आम्ही तुमच्या सर्व अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू,” असे आश्वासन महाजन यांनी दिले. तसेच, “आतापर्यंत तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत काम केले. आठ वेळा आमदारकीची निवडणूक लढवली आहे, पण आता हा तुमचा शेवटचा पक्षप्रवेश आहे आणि भाजपमध्ये तुम्हाला योग्य स्थान मिळेल,” असे सूचक विधानही त्यांनी केले. “कोणत्याही स्वार्थासाठी पक्षात आलेलो नाही” – शिरीष कोतवाल भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिरीषकुमार कोतवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “आजपासून आम्ही भाजपवासी झालो आहोत. कोणत्याही स्वार्थासाठी किंवा अटींसाठी आम्ही पक्षात आलेलो नाही. देशाच्या विकासासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी सांगितले. काँग्रेसमधील नाराजीमुळे पक्ष सोडल्याचे नमूद करताना ते म्हणाले, “काँग्रेसमध्ये गेल्या काही काळापासून मी नाराज होतो. ती नाराजी वाढत गेली आणि अखेर या पक्षप्रवेशात रुपांतर झाली.” “भाजपचा बालेकिल्ला अधिक बळकट झाला” – आमदार राहुल आहेर या सोहळ्याला उपस्थित असलेले आमदार राहुल आहेर यांनी शिरीष कोतवाल यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढल्याचे स्पष्ट केले. “मी तीन निवडणुका शिरीष कोतवाल यांच्या विरोधात लढलो, पण कधीही वैयक्तिक पातळीवर टीका केली नाही. आम्ही नेहमीच तत्त्वांवर आधारित राजकारण केले,” असे ते म्हणाले. “आज गिरीश भाऊंसोबत शिरीष भाऊही भाजपमध्ये आल्याने आमचा बालेकिल्ला आणखी मजबूत झाला आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. या सोहळ्याला आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार, ज्येष्ठ नेते विजय साने, माजी आमदार बाळासाहेब सानप, भाजप उत्तर जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, दक्षिण जिल्हाध्यक्ष यतीन कदम, लक्ष्मण सावजी यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. चांदवडसह नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी हा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. नाशिकमधील शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश: या सोहळ्यात कोतवाल यांच्यासह नरेश पाटील, नीलम पाटील, शिवाजी बस्ते, गौरव आग्रवाल, सागर निकम, भागवत जाधव, एकनाथ पगार, शिवाजी कासव, दिनेश जाधव, गुलाब पवार, बाळासाहेब शिंदे तसेच आजी-माजी सरपंचांसह अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.