Satara: ध्वनिवर्धकाच्या दणदणाटाने ज्येष्ठ नागरिक हैराण
Satara मिरवणूक संपल्यानंतर विश्वेश्वर मंदिरासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा पडून राहिला. या कचऱ्याच्या शेजारीच दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ महिला विश्रांती घेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करताना स्वच्छता, ध्वनिप्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्याची कोणतीही जबाबदारी संबंधितांना जाणवली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.

Satara: शहरातील मंगळवार पेठेतील विश्वेश्वर मंदिर परिसरात शनिवारी दि. २२ रोजी सायंकाळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान ध्वनीवर्धकाचा कानठळ्या बसविणारा आवाज, लेसर किरणांचा वापर, तसेच काही तरुण- तरुणी आणि महिलांकडून करण्यात आलेले नृत्य यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. श्री गणरायाच्या आगमनापूर्वीच त्याच्या स्वागतासाठी सुरु झालेले ध्वनी प्रदूषण आणि लेझर किरणांचा वापर संतापाचे कारण ठरले आहे. या प्रकाराची सामूहिक तक्रार करण्याची निर्णय या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी घेतला आहे.
मिरवणूक संपल्यानंतर विश्वेश्वर मंदिरासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा पडून राहिला. या कचऱ्याच्या शेजारीच दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ महिला विश्रांती घेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करताना स्वच्छता, ध्वनिप्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्याची कोणतीही जबाबदारी संबंधितांना जाणवली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.
ध्वनिवर्धकाच्या प्रचंड आवाजाने विश्वेश्वर मंदिर परिसर अक्षरशः दणाणून गेला होता. आवाजाची तीव्रता इतकी होती की, नागरिकांच्या कानांचे पडदे थरथरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुले आणि ध्वनिप्रदूषणास संवेदनशील असलेल्या नागरिकांना याचा मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. मात्र, मिरवणुकीतील संयोजक आणि सहभागी नागरिक आपण काय करीत आहोत, याचे भान विसरल्याचे चित्र होते.
समर्थ परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेचे कार्याध्यक्ष विजय देशपांडे यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. आवाजाच्या दणदणाटाची प्रवृत्ती कायमची नष्ट करण्यासाठी केवळ कायदे करून उपयोग नाही, तर त्यांची कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिक्षेबरोबरच दंडात्मक कारवाईही झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मिरवणुका, ध्वनिवर्धक आणि नियमबाह्य ध्वनिवर्धकांबाबत प्रशासनाला माहिती देणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने स्वतंत्र यंत्रणा उभी करावी. नियमभंगाची माहिती देऊन कारवाईस मदत करणाऱ्या नागरिकांना आर्थिक मोबदला देण्याची पद्धत सुरू केल्यास अधिकाधिक नागरिक पुढे येतील आणि ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यास मदत होईल, अशी सूचनाही देशपांडे यांनी केली.
गणेशोत्सवापूर्वी पोलिसांनी ठोस निर्णय घ्यावा
गणेशोत्सव तोंडावर आला असून या काळात ध्वनिवर्धक, लेसर शो आणि मिरवणुकांमधील नियमभंगाचे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस करमणूक केंद्रात उद्या होणाऱ्या बैठकीत या प्रश्नावर केवळ चर्चा न करता ठोस आणि कठोर निर्णय घ्यावा, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संस्थेने केली आहे.
उत्सव साजरे करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, त्या उत्सवामुळे इतर नागरिकांचे आरोग्य, शांतता आणि सार्वजनिक स्वच्छता धोक्यात येता कामा नये. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन डीजेच्या दणदणाटावर पोलिस आणि प्रशासनाने वेळीच लगाम घालावा, अन्यथा गणेशोत्सव काळात ध्वनिप्रदूषणाविरोधात जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.





