Shirur Crime News : एटीएम कार्डची अदलाबदल करून ज्येष्ठ नागरिकाची 38 हजारांची फसवणूक
Shirur Crime News : पाचर्णे यांचा विश्वास संपादन केल्यानंतर संबंधित इसमाने हातचलाखीने त्यांच्या एटीएम कार्डची दुसऱ्या कार्डासोबत अदलाबदल केली.

शिरूर : एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या एटीएम कार्डची चलाखीने अदलाबदल करून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ३८ हजार रुपये काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार शिरूर शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरसींग लक्ष्मण पाचर्णे (वय ६६, रा. करडे, ता. शिरूर) हे दि. ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास शिरूर येथील बी.जे. कॉर्नरजवळ असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते.
यावेळी एटीएममध्ये आधीपासून उपस्थित असलेल्या अंदाजे ३० ते ३२ वर्षे वयाच्या अनोळखी इसमाने पाचर्णे यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली. “आपके पैसे कट हुये है, आप एटीएम की स्लिप क्यों नहीं ली, रुको मैं आपको स्लिप निकालकर देता हूं,” असे सांगून त्याने पाचर्णे यांच्याकडून त्यांचे एटीएम कार्ड घेतले.
पाचर्णे यांचा विश्वास संपादन केल्यानंतर संबंधित इसमाने हातचलाखीने त्यांच्या एटीएम कार्डची दुसऱ्या कार्डासोबत अदलाबदल केली. त्यानंतर पाचर्णे यांच्या एटीएम कार्डचा वापर करून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ३८ हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. काही वेळाने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाचर्णे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी सध्या अनोळखी असून त्याचे वय अंदाजे ३० ते ३२ वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांकडून एटीएम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती तसेच एटीएम व्यवहाराची माहिती तपासण्याचे काम सुरू असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शुभमचव्हाण करीत आहेत.
ज्येष्ठ नागरिकांनी एटीएममध्ये अनोळखी व्यक्तीची मदत घेताना विशेष काळजी घ्यावी, तसेच कोणत्याही व्यक्तीकडे एटीएम कार्ड किंवा पिनची माहिती देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.





