भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पुन्हा बिघडली; दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल

L K Advani । भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना आज मंगळवारी दिल्लीतील एका मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयातील सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, अडवाणी (९६) यांना आज येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
तत्पूर्वी, जुलैच्या पहिल्या आठवड्यात अडवाणींना या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवस वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर त्यांना (रुग्णालयातून) डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांना न्यूरोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. यापूर्वीही अडवाणी यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले होते आणि तेथे रात्रभर ठेवल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले होते.
दरम्यान, अडवाणी यांनी 1998 ते 2004 पर्यंत गृहमंत्री आणि 2002 ते 2004 पर्यंत उपपंतप्रधान म्हणून काम केले. 2009 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. या वर्षी 31 मार्च रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अडवाणी यांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन सन्मानित केले.





