‘ते’ पार्सल कुठेही पाठवा पण मुंबईत पाठवू नका

शिवसेना प्रमुख उद्वव ठाकरेंचे छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात सर्वच राजकीय पक्षांच्या सभा होत आहेत. त्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याही राज्यभरात सभा सुरू आहेत. त्यांची येवला-लासलगाव मतदारसंघात प्रचार सभा झाली. यावेळी ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. येवल्याच्या विकासासाठी वचननामा करावा लागला. मग सत्तेसाठी आमदार काय करत होते? त्यामुळे आता वेळ आलेली आहे. इथला पाहुणा निवडून देऊ नका. हे पार्सल पाठवून द्या. कुठेही पाठवा पण मुंबईत पाठवू नका, असे टीकास्त्र ठाकरे यांनी भुजबळांवर सोडले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांनी राज्यात जोर धरला आहे. युती आणि आघाडीतील पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचे प्रचार काम एकदम जोरात सुरू आहे. दरम्यान, येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची नुकतीच सभा झाली. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना झालेल्या अटकेवरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर ती चूक छगन भुजबळांची होती, असे नाव घेवून सांगावे. विभागाच्या प्रमुखांची ती चूक होती, असे ते सांगत असले तरी पक्षाचे प्रमुख शरद पवार हे त्यावेळी ती चूक करणाऱ्यांचे बाप होते, हे विसरता येणार नाही, असे ठाकरे म्हणाले. तसेच बाळासाहेबांनी सूडाने कारवाई करणाऱ्यांच्या पार्श्वभागावर लाथ घातली असती. शिवशाहीचे सरकार आल्यानंतर कोणाशीही सूडाने वागू नका, जनतेची कामे करा, सुख-समाधान द्या, न्याय्य-हक्कासाठी आंदोलन करणाऱ्यांवर लाठया चालवू नका, असे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना निक्षून सांगितले होते, असे उद्धव ठाकरे यावेळी सांगितले. राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात समस्या आहे. त्या सोडवण्यासाठी मला विधानसभेत महायुतीचे 288 आमदार पाहिजेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.