‘एमएसपी’साठीच्या लढ्यात पंजाब एकाकी नसल्याचा संदेश केंद्र सरकारला पाठवा; शेतकरी नेत्याचे आवाहन

चंदिगढ – शेतमालाला किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी मिळायला हवी. संपूर्ण देशाला एमएसपीची गरज आहे, अशी ठाम भूमिका शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांनी शनिवारी मांडली. एमएसपीसाठीच्या लढ्यात पंजाब एकाकी नसल्याचा संदेश केंद्र सरकारला पाठवा, असे आवाहनही त्यांनी देशभरातील शेतकरी संघटनांना केले.
केंद्र सरकारने एमएसपीसह विविध मागण्या मान्य कराव्यात यासाठी पंजाबमधील शेतकरी आग्रही आहेत. त्यांनी सरलेल्या वर्षातील फेब्रुवारीत दिल्लीच्या दिशेने कूच सुरू केले. मात्र, त्यांना सुरक्षा दलांनी पंजाब-हरियाणा सीमेवर रोखले. तेव्हापासून शेतकरी सीमेवरच तळ ठोकून आहेत.
सीमेवरील खनौरी या ठिकाणी आंदोलनाचा चेहरा बनलेले ७० वर्षीय डल्लेवाल यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा शनिवारी ४० वा दिवस होता. प्रकृती खालावली तरी ते उपोषणावर ठाम आहेत. त्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खनौरी भागात शेतकरी महापंचायतीचे आयोजन करण्यात आले. तिथे डल्लेवाल यांना स्ट्रेचरवरून आणले गेले. त्यांनी बेडवर पडूनच शेतकऱ्यांना उद्देशून सुमारे ११ मिनिटांचे भाषण केले.
देशातील शेतकऱ्यांच्या हितापेक्षा माझे आयुष्य महत्वाचे नाही. आतापर्यंत देशातील ७ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या कुटूंबीयांवर काय बेतले असेल ते मी समजू शकतो. याआधी आपण दिल्लीच्या सीमांवरील केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी झालो.
आता पंजाब पुन्हा आंदोलनात आघाडीवर आहे. इतर शेतकरी संघटनांनीही त्यांच्या राज्यांत आंदोलन पुढे न्यावे अशी विनंती मी हात जोडून करतो. मला स्वत:च्या आयुष्याची चिंता नाही. आणखी शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी लढावेच लागेल, असे ते म्हणाले.





