अहिल्यानगर : राज्यातील पूरस्थिती आणि पूरग्रस्तांच्या मदतीसंदर्भात महाराष्ट्र सरकारने अहवाल पाठवावा, आम्ही लगेच मदत पाठवतो, असे आश्वासक भाष्य केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केले. दरम्यान, राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना २२१५ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले असून शेतक-यांना केंद्र सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. अहिल्यानगर येथील विविध प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हजेरी लावली. यावेळी, लोणी बाजारतळ येथे आयोजित शेतकरी मेळाव्यास संबोधित केले. अमित शहा म्हणाले, महाराष्ट्राचे त्रिमूर्ती जे आहेत, यातून एकही बनिया नाही. मात्र तिघेही बनियापेक्षा पक्के आहेत असे म्हणत काल तिघांनी माझ्यासोबत शेतक-यांसंदर्भात बैठक केली, शेतक-यांना मदतीसाठी मागणी केली, असे त्यांनी म्हटले. त्यावेळी, मी म्हणालो, महाराष्ट्र सरकारने अहवाल पाठवावा, आम्ही लगेच मदत पाठवतो. हे होऊ शकतं कारण शेतक-यांची काळजी घेणारं हे सरकार आहे. आपल्या एनडीएच्या सर्वच आमदार-खासदारांनी सीएम रिलिफ फंडामध्ये एक महिन्याचे वेतन देऊन मदत केली आहे, अशी माहितीही अमित शहांनी दिली. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने 10 हजार रोखीने देण्याचे तसेच 35 किलो खाद्य देण्यासाठी पुढाकार घेतला आहे, असे सांगतानाच अल्पमुदतीच्या कर्जांची वसुली थांबवली असल्याचेही सांगितले. शेतकऱ्यांची चिंता करणारे सरकार महाराष्ट्रात बनले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये, असे अमित शहा म्हणाले. मी आज येथे आलो, मला आनंद झाला. पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या नावाने हा जिल्हा जोडला गेलेला आहे. औरंगाबाद शहराचे नाव आम्ही बदलले, हे तेच लोक करू शकतात, जे शिवछत्रपतींचे अनुयायी आहेत. जे औरंगजेब यांचे विचार पुढे घेऊन जातात, ते करू शकत नाहीत, असे म्हणत अमित शहांनी नाव न घेता विरोधकांवर हल्लाबोल केला. हिंदुत्व सोडण्यावरून विरोधकांवर जोरदार टीका केली.