पुणे | कलाकारांमध्ये स्वाभिमान जरुरी; पण अहंकार नसावा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – एकल सादरीकरण आणि साथसंगत करत असताना प्रत्येक वादकाची समरस भूमिका महत्त्वाची असते. प्रत्येक कलाकार आपल्या कलेवर प्रेम करतच असतो. मात्र, ज्याच्यासोबत आपण वादन करीत आहोत, त्या गायकासोबत प्रामाणिकपणे एकरूप होऊन सादरीकरण करणारे वादक फार कमी असतात. कलाकारामध्ये अहम नसावा. मात्र, स्वाभिमान आणि विनम्रता असणे गरजेचे आहे, असे मत मेवाती घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं. संजीव अभ्यंकर यांनी व्यक्त केले.
गायक जेव्हा व्यासपीठावर आपल्या कलेचे सादरीकरण करतो, तेव्हा साथसंगत करणाऱ्या वादकाची भूमिका देखील महत्वपूर्ण असते. या वेळी वादकाने केवळ साथ म्हणून वादन करता कामा नये. वादन करत असताना गायकाची सौंदर्यदृष्टी, विचारधारा समजून वादकाने समरस होऊन साथसंगत केल्यास कार्यक्रम अधिक रंगतो, असेही अभ्यंकर म्हणाले.
सुप्रसिद्ध संवादिनी वादक तन्मय देवचके यांच्या स्वरानुजा या म्युझिक अकादमीच्या वतीने नुकतेच ‘उगम’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उगम या कार्यक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. आज संवादिनीला एकल वाद्य म्हणून लोकप्रियता मिळत आहे.
हे होत असताना यामध्ये तन्मय देवचके यांसारख्या संवादिनी वादकाची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे, असे मला वाटते. तन्मयने केलेल्या भविष्यवेधी विचाराने इतर अनेक शिष्यांना देखील तो मार्ग दाखवत आहे.
तन्मय करत असलेले काम पुढील १०-१५ वर्षांत किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला उमगेल. तो आज शिष्यांना कलासमृद्ध करत असून, कलादृष्टी देत असल्याचे डॉ. अभ्यंकर यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात तन्मय देवचके यांचा ‘तन्मय इन हार्मनी’ हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. मानसी आरगडी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.





