Self Care: आजच्या धावपळीच्या जीवनात लोक स्वतःसाठी वेळ काढायलाच विसरतात. कामाचा ताण, जबाबदाऱ्या आणि बदललेली जीवनशैली यामुळे अनेक जण मानसिक आणि शारीरिक थकव्याला सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत सेल्फ केअर हा एक महत्त्वाचा उपाय ठरतो. रोज वेळ मिळत नसेल, तरी आठवड्यातून एक दिवस स्वतःसाठी काढला, तरीही त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. सेल्फ केअर म्हणजे फक्त आराम करणे नव्हे, तर स्वतःच्या शरीराची आणि मनाची काळजी घेणे होय. आठवड्यातील एक दिवस ‘सेल्फ केअर डे’ म्हणून पाळल्यास पूर्ण आठवड्याचा ताण कमी होतो आणि मन ताजेतवाने होते. यामुळे जीवनात संतुलन राखणे सोपे जाते. या दिवशी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘डिजिटल डिटॉक्स’. काही तासांसाठी मोबाईल, सोशल मीडिया आणि स्क्रीनपासून दूर राहणे गरजेचे आहे. आजकाल लोक पूर्णपणे मोबाईलवर अवलंबून झाले आहेत, ज्यामुळे मानसिक थकवा वाढतो. त्यामुळे या दिवशी फोन फक्त आवश्यक कॉल्ससाठीच वापरावा आणि उर्वरित वेळ निसर्गात किंवा कुटुंबासोबत घालवावा. तसेच, ‘सोलो टाइम’ म्हणजे स्वतःसोबत वेळ घालवणेही खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही एकटे कॅफेमध्ये जाऊ शकता, पुस्तक वाचू शकता, संगीत ऐकू शकता किंवा आपल्या आवडीची एखादी गोष्ट करू शकता. काही लोकांसाठी बागकाम किंवा चित्रकला यासारख्या गोष्टी मनाला शांतता देतात. Self-Care सेल्फ केअर डेचा आणखी एक महत्त्वाचा नियम म्हणजे ‘नो वर्क डे’. या दिवशी ऑफिसचे काम, कॉल्स किंवा ईमेल्सपासून शक्यतो दूर राहावे. हा दिवस कामासाठी नसून स्वतःला रिचार्ज करण्यासाठी असतो. त्यामुळे या दिवशी पूर्णपणे विश्रांती घेणे आवश्यक आहे. याशिवाय, शरीराची योग्य काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आठवड्यातून एकदा ऑईल मसाज, स्क्रब, फेस पॅक, केसांना तेल लावणे आणि रिलॅक्सिंग बाथ घेणे यासारख्या गोष्टी केल्यास शरीरातील थकवा दूर होतो. यामुळे त्वचा, केस आणि शरीर अधिक निरोगी राहतात. मनाला शांतता देण्यासाठी ‘डीप रिलॅक्सेशन’ अॅक्टिव्हिटीही उपयोगी ठरतात. यामध्ये योग, ध्यान, लांब फेरफटका, स्पा किंवा स्टीम थेरपी यांचा समावेश होतो. काही लोकांना स्वयंपाक किंवा पुस्तक वाचणे यामुळेही मन शांत होते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार अशा गोष्टी निवडाव्यात. एकंदरीत, आठवड्यातील एक दिवस स्वतःसाठी राखून ठेवला, तर तो तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. छोट्या-छोट्या सवयींमुळे आयुष्यात मोठा बदल घडू शकतो.