आदर्श शिक्षक सन्मानासाठी विलासराव आपटे यांची निवड

पुसेसावळी – गुरुपौर्णिमेनिमित्त कराड येथील जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्रांच्यावतीने होणार्या आदर्श शिक्षक सन्मानासाठी विलासराव श्रीपती आपटे यांची निवड झाली आहे. यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात उद्या, दि. 21 रोजी सायंकाळी 5 वाजता हा सोहळा होणार आहे.
आपटे हे गेली 27 वर्षे कार्यरत असून त्यांचे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत चमकले आहेत. ते सध्या हिंगणगाव (जि. सांगली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असून, ही शाळा ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम आली आहे. आर्थिक, सामाजिकदृष्ट्या मागास व दिव्यांग विद्यार्थांना सोयीसवलती मिळवून देण्यासाठी आणि त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. कार्यानुभव, कला, आरोग्य, व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांच्या आयोजनात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग असून, त्यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारसह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.आदर्श शिक्षक सन्मानासाठी निवड झाल्याबद्दल आपटे यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.





