Satara | ‘आरटीइ’ अंतर्गत जिल्ह्यात १६६८ बालकांची निवड

सातारा, (प्रतिनिधी) – सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दि. ७ जून रोजी काढण्यात आलेल्या सोडतीची निवड यादी व प्रतिक्षा यादी दि. २० जुलै राजी प्रसिध्द करण्यात आली आहे. जिल्ह्यात १८०४ रिक्त जागांपैकी १६६८ बालकांची निवड करण्यात आली आहे.
संबंधितांनी नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावर मेसेज जाण्यास सुरुवात झाली असून दि. २३ ते ३१ जुलै या कालावधीत तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करुन पडताळणी समितीमार्फत आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी केले आहे.
आरटीइ प्रवेशसंदर्भात उच्च न्यायालय मुंबई यांची अंतरिम स्थगिती असल्यामुळे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली नव्हती. उच्च न्यायालयाने जनहित याचिका व रिट याचिकेवर दि. १९ जुलै रोजी अंतिम निर्णय दिला आहे.
त्यानुसार २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दि. ७ जून रोजी काढण्यात आलेल्या सोडतीची निवड यादी व प्रतिक्षा यादी दि. २० जुलै रोजी संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस जाण्यास सुरुवात झाली आहे.
प्रवेश मिळाल्याचा एसएमएस प्राप्त झालेल्या पालकांनी दि. २३ ते ३१ जुलै पर्यंत आपल्या जिल्हयातील संबंधित तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करुन पडताळणी समितीमार्फत आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करुन घ्यावा, अशा सुचना शबनम मुजावर याांनी केल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात २२२ शाळा आरटीइसाठी पात्र असून १८०४ रिक्त जागांसाठी ऑनलाइन पध्दतीने ३ हजार ५४२ अर्ज प्राप्त झाले होते. प्रत्यक्षात १६६८ बालकांची आरटीइ अंतर्गत निवड करण्यात आली आहे.
कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर संंबंधितांना तात्काळ प्रवेश देण्याच्या सुचना शासन स्तरावरुन मिळाल्या आहेत. त्यानुसार एकही बालक आरटीइ शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शिक्षण विभाग कार्यवाही करत असल्याचे शबनम मुजावर यांनी सांगितले.
शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया पूर्णत: ऑनलाईन असून यामध्ये कुठेही मानवी हस्तक्षेप करता येत नाही. शासन नियमानुसार व आरटीइ कायद्यानुसार ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पालकांनी या प्रक्रियेसाठी कोणताही दबाव आणण्याचा प्रयत्न करु नये. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच प्रवेश निश्चित होणार आहे. – शबनम मुजावर (शिक्षणाधिकारी प्राथमिक)





