लॉकडाऊनमध्ये यंत्रणांची भूमिका बघ्याची!

मॉर्निंग, इव्हिनिंग वॉकसह रस्त्यावर खासगी वाहनांची वर्दळ देतेय करोनाला निमंत्रण
सातारा (प्रतिनिधी) –करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात सुरु असणाऱ्या लॉकडाऊनमध्ये मॉर्निंग, इव्हिनिंग वॉकला मनाई असतानाही जिकडे, तिकडे चोहीकडे वॉकिंगला बाहेर पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असून करोनाला निमंत्रण देण्याचाच हा प्रकार आहे. प्रशासनातील यंत्रणा मात्र कारवाई करण्याऐवजी बघ्याचीच भूमिका घेताना दिसत आहेत.
करोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दि. 17 ते 26 जुलै या कालावधीत लॉकडाऊन जाहीर केले आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या होत्या. मात्र, रस्ते बंद करण्याशिवाय काहीच केल्याचे दिसत नाही. अद्यापही सर्व प्रकारची वाहने रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. वास्तविक अत्यावश्यक सेवेशिवाय अन्य वाहनांना बंदी असतानाही ही वाहने बाहेर फिरतातच कशी असाही प्रश्न निर्माण होत आहे. रस्ते अडवून सर्वसामान्यांची मुस्कटदाबी करण्याऐवजी प्रशासनाने सरसकट आणि सडेतोड भूमिका घेण्याची गरज आहे. मात्र प्रशासनाची भूमिका नेहमीच गोरगरीबांची मुस्कटदाबी करणारी राहिली असल्याची तक्रार सामाजिक संघटनांकडून होत आहे.
एकीकडे लॉकडाऊन करायचे आणि दुसरीकडे सर्व काही खुल्लम खुल्ला असला प्रकार सध्या सातारा शहर आणि परिसरात सुरु आहे. मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकला मनाई असतानाही लोक समुहाने एकत्र फिरत आहेत. शाहूपुरीतील आंबेदरे रोड, दिव्यनगरी रोड, वर्ये, कोंडवे रस्ता, भैरोबा पायथा, यवतेश्वर रोड, कुरणेश्वर रोड, जुना आरटीओ ऑफिस ते वाढेफाटा असे किती तरी रस्ते आहेत त्यावरुन धनदांडग्यांच्या सवारी वॉकिंगला बाहेर पडत आहेत. बर नुसते नागरिक पडले असते तर ठिक पण सोबत हजारो रुपये किंमतीचे श्वानही मॉर्निंग वॉक करुन येत आहेत. वॉकिंगला बाहेर पडणाऱ्यांची वाढती संख्या आणि समुहाने एकत्रित फिरण्याच्या या प्रकाराने सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडत आहे. संबंधित यंत्रणांनी याची दखल घेवून कडक कारवाईची भूमिका घेण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या कारवाया झाल्या नाहीत तर लॉकडाऊन काय कामाचे असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
हे कसले लॉकडाऊन?
लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्ती, वाहनांव्यतिरिक्त सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र, शहरातील रस्त्यावर फेरफटका मारला असता दिवसरात्र वाहतूक या रस्त्यावरुन होताना दिसत आहे. नागरिक खुलेआम फिरत आहेत. मुळात शहराच्या प्रवेशद्वारांवर आता तरी खबरदारी घेण्याची गरज आहे. वाढे फाटा, म्हसवे रोड, मोळाचा ओढा, दिव्यनगरी रोड, बोगदा परिसर, बॉम्बे रेस्टॉंरंट, शिवराज चौक आदी शहरात येणाऱ्या रस्त्यावर ठिकाणी योग्य ती खबरदारी घेतली जात नाही. प्रशासन जर लॉकडाऊनची गांभिर्याने अंमलबजावणी करणार नसेल तर मग हे कसले आणि कशासाठी लॉकडाऊन असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.





