Fahim Khan : फहीम खानसह 6 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; नागपूर पोलिसांनी दिली माहिती

नागपूर : पोलिसांवर झालेली दगडफेक ग्लोरिफाय केली होती. त्यासोबत अल्लाहू अकबर, सर तनसे जुदा असे कॅप्शन टाकलेले आहेत. हे सर्व हिंसाचाराला बढावा देण्यासाठी अशा प्रकारच्या पोस्ट करण्यात आल्या. अशा लोकांवर देशद्रोहाचे कलम लावण्यात येईल. आतापर्यंत 6 आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये फहीम खानचाही समावेश आहे.
देशद्रोहाचा गुन्ह्यात आणखी आरोपींचा समावेश होईल, असे लोहित मतानी यांनी सांगितले. नागपूर हिंसाचार प्रकरणात एनआयए तपास करणार की, नाही याबाबत केंद्र सरकार निर्णय घेईल. तर एटीएसचा निर्णय हा राज्य सरकार घेईल, असे सायबर पोलिसचे डीसीपी लोहित मतानी यांनी सांगितले. नागपूर हिंसाचारासाठी वादग्रस्त मजकुराचे अनेक फेसबुक पेज सापडले आहेत. त्यावर जिहादी आणि अतिरेकीसारखा मजकूर आहे.
यापुढे कोणतीही अनुचित घटना घडू नये, तेढ वाढू नये यासाठी सोशल मीडियावरील पोस्ट ब्लॉक करण्याचे काम सुरू आहे. अशा प्रकारचे सोशल मीडियावरील 17 ते 19 तारखेपर्यंतचे सर्व पेजेस ब्लॉक करण्यासाठी आम्ही संबंधित एजन्सीला पाठवले आहेत. आतापर्यंत 50 टक्के पोस्ट ब्लॉक केलेल्या आहेत. इतर पोस्ट लवकर ब्लॉक होतील. हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खान हा सायबर गुन्ह्यातही आरोपी आहे, अशी माहितीही मतानी यांनी दिली आहे.





