India-Nepal border – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगळवारी होणाऱ्या अयोध्येतील ध्वजारोहण समारंभाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलीस व सशस्त्र सीमा दलांनी भारत व नेपाळ सीमेवर दक्षता वाढवली आहे. दहशतवादी हलचाली रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना सीमा ओलांडणाऱ्या लोकांची ओळख पडताळण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक सोमेंद्र मीणा यांनी दिले आहेत. तसेच सीमा पोलीसांना व स्थानिक गुप्तचर युनिटला देखील हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मीणा यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या दौर्याच्या अनुशंघाने सीमेवरील सर्व चौक्यांना दक्षतेचे आदेश देण्यात आले असून राष्ट्रविरोधी घटकांना रोखण्यासाठी संवेदनशील सीमाभागांमध्ये गस्त वाढविण्यात आली आहे. काही बंडखोरांच्या संभाव्य हलचालींची माहिती मिळाली असल्याने एसएसबीचे जवान सोनौली सीमेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी सिनेमा हॉल, हॉटेल्स आणि रेल्वे आणि बस स्थानकांसह सार्वजनिक ठिकाणी देखील गस्त वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी अयोध्येला भेट देतील आणि राम मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकवतील, जे मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रतीक आहे.