सूरत – पाच वर्षांपूर्वी हत्या झालेल्या एका व्यक्तीच्या मृतदेहाचा सांगाडा पोलिसांना सापडला आहे. घराच्या भिंतीमध्ये हा मृतदेह लपवून ठेवला होता, असे पोलिसांनी सांगितले. किशन चौहान असे मयत व्यक्तीचे नाव असून तो पांडेसरा भागातील रहिवासी होता.
राजीव रजपूत या त्याच्या मित्रानेच पाच वर्षांपूर्वी त्याची हत्या केली होती, असे सूरतच्या गुन्हे शाखेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
राजीव रजपूतने चौहानचा मृतदेह आपल्या घराच्या कोपऱ्यामध्ये ठेवून त्याच्याभोवती भिंत बांधली होती. याबाबतची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने पांडेसरा भागात छापा घालून घरातील भिंत फोडून चौहानचा मृतदेह बाहेर काढला.
पाच वर्षांमध्ये हा मृतदेह पूर्ण कुजला होता आणि त्या ठिकाणी केवळ एक सांगाडा शिल्लक राहिला होता. मूळचा बिहारचा असलेल्या राजीव राजपूत याला पोलिसांनी अटक केली असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. चौहान बेपत्ता झाल्यावर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवलेली नव्हती.