पुणे – शहरात करोना बाधित असलेल्या 50 वर्षीय महिलेचा गुरुवारी (दि.2) उपचारादरम्यान मृत्यू झाला. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. शहरातील करोनाचा हा दुसरा बळी असून, नागरिकांनी आता तरी जबाबदारीने आणि शहण्यासारखे वागून घरातच बसावे.
करोनाचा विषाणू हा स्वत:बरोबर पहिल्यांदा आपल्या घरातील व्यक्तीना बाधा पोहोचवत आहे. त्यामुळे नागरिक किमान आपल्या कुटुंबासाठी तरी घरात स्वतःला कॉरानटाईन करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सर्दी, ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे संबधीत महिलेला बुधवारी (दि.1) ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी प्रकृती गंभीर होती. तीच्या आजाराची लक्षणे करोनासारखी दिसत असल्यामुळे ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी तात्काळ तिचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. आज त्याचा अहवाल पॉझीटीव्ह आला. मात्र, आज संध्याकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी माहिती ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली.