मुंबई – गुंतवणूकदारांना प्रशिक्षण देताना अनेक संस्था सध्या, बाजारातील सध्याच्या घडामोडीची आकडेवारी (करंट लाईव्ह मार्केट डेटा )वापरतात. यामुळे गुंतवणूकदारांची दिशाभूल होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत सध्याच्या घडामोडींची आकडेवारी इन्फ्लुएन्सरना किंवा प्रशिक्षकांना वापरता येणार नाही, अशा प्रकारचा नियम लवकरच बाजार नियंत्रक सेबी करणार आहे. सेबीचे अध्यक्ष तुहीन कांत पांडे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, यासंदर्भात नियंत्रणासंदर्भातील नियमात कसलीही पोकळी नाही. गुंतवणूकदार प्रशिक्षकांकडून नियमाचा योग्य अर्थ लावला जात नसल्याचे दिसते असे पांडे यांनी म्हटले. राष्ट्रीय शेअर बाजाराने या संदर्भात मदत व्हावी म्हणून ‘पास्ट रिस्क अँड रिटर्न व्हेरिफिकेशन एजन्सी’ सुरू केली आहे. यावेळी बोलताना पांडे म्हणाले की, सेबीच्या सध्याच्या नियमानुसार प्रशिक्षकांना स्टॉक टीप अॅडव्हाइस करता येत नाही. भारतातील गुंतवणूकदार स्वतः पुरेसा अभ्यास करून गुंतवणुकीचे निर्णय घेत नाहीत, अशी माहिती एका सर्वेक्षणात आढळून आल्याचे पांडे यांनी सांगितले. ते म्हणाले की, आम्ही घेतलेल्या सर्वेक्षणानुसार एकूण गुंतवणूकदारांपैकी 62% गुंतवणूकदारांनी केवळ सल्लागारांच्या म्हणजे फिन इन्फ्लुएन्सर च्या शिफारसीप्रमाणे प्रत्यक्ष गुंतवणुकीचे निर्णय घेतले आहेत. फिन इन्फ्लुएन्सर अनेकदा अव्वाच्या सव्वा परतावा मिळेल म्हणून संबंधित गुंतवणुकीच्या शिफारसी करतात. त्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होत असल्याचे दिसून येते. एकूण गुंतवणूकदारांच्या केवळ 30 टक्के गुतवणूकदारांना गुंतवणुकी संदर्भात पुरेशी ज्ञान असते. बाकीचे गुंतवणूकदार चुकीच्या सल्ल्याला बळी पडतात. गुंतवणूकदारांना जबाबदारीने निर्णय घेता यावे यासाठी आवश्यक आकडेवारी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करीत आहोत. फिन इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखल्या जात असलेल्या अवधूत साठे यांच्यावर सेबीने गेल्या आठवड्यात बंदी घालून त्यांना अयोग्य रीतीने कमविलेले 546 कोटी परत करण्याचा आदेश सेबीने दिला आहे. या पार्श्वभूमीवर पांडे यांच्या वक्तव्याला महत्त्व देण्यात येत आहे. सेबीच्या सर्क्युलरमध्ये परस्परविरोध प्रशिक्षणासाठी लाईव्ह डेटा वापरण्यासंदर्भातील सेबीच्या दोन सर्क्युलरमध्ये परस्पर विरोध असल्याचे पांडे यांनी मान्य केले. आता आम्ही हा परस्पर विरोध कमी करणारा नवा नियम जारी करणार आहोत. त्यानुसार प्रशिक्षकांना गुंतवणूकदारांना प्रशिक्षण देताना फक्त इतिहासातील डेटा वापरण्याची परवानगी मिळेल. त्यांना सध्याची माहिती वापरता येणार नाही.