मुंबई – अदानी समूहातील अदानी विल्मर लिमिटेड या कंपनीने प्राथमिक समभाग विक्रीसाठी म्हणजे आयपीओसाठी बाजार नियंत्रक सेबीकडे अर्ज दाखल केला होता. मात्र या आयपीओला तुर्तास परवानगी न देता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय सेबीने घेतला आहे.
आयपीओला स्थगिती देण्याचा निर्णय नेमका का घेण्यात आला याचे स्पष्टीकरण सेबीकडून उपलब्ध करण्यात आलेले नाही. या माध्यमातून या कंपनीने 4500 कोटी रुपये उभे करायचे ठरविले होते.अदानी विल्मरतर्फे तीन ऑगस्ट रोजी या संदर्भातील कागदपत्रे सेबीकडे दाखल करण्यात आली होती.
सेबीने सांगितले की तूर्त या आयपीओला परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात अदानी विल्मर कंपनीने म्हटले आहे की सेबीने मागितलेली संपूर्ण माहिती आम्ही वेळोवेळी देत असतो. या वेळीही दिली आहे. भविष्यात या संदर्भात सेबीने माहिती मागितली तर दिली जाईल. आयपीओतून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग उद्योगाच्या विस्तारीकरणासाठी केला जाणार होता. अदानी विल्मर कंपनी खाद्यतेल क्षेत्रात असून भारतातील खाद्यतेल क्षेत्रात कंपनीचा मोठा वाटा आहे.