Indian Market : जागतिक अनिश्चिततेमुळे वाढलेल्या अस्थिरतेनंतरही भारतीय बाजारपेठांनी लवचिकता दाखवली असून, चढ-उतार नियंत्रणात राहिले आहेत, असे बाजार नियंत्रक सेबीचे अध्यक्ष तुहिन कांता पांडे यांनी सांगितले. अस्थिरता वाढली असली तरी, ही परिस्थिती भांडवल बाजाराच्या आवाक्याबाहेरची नाही. तेलाच्या किमती आणि पुरवठ्यातील धक्क्यांमुळे. सर्व अर्थव्यवस्था प्रभावित झाल्या आहेत. साहजिकच अर्थव्यवस्थेवर त्याचे दूरगामी परिणामही होत आहेत, असे ते म्हणाले. गेल्या दशकात भारतात बाजार भांडवल 2016 मधील 95 लाख कोटी रुपयांवरून एप्रिल 2026 मध्ये 463 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले. त्याच वेळी कॉर्पोरेट बॉण्ड बाजार 20 लाख कोटी रुपयांवरून 60 लाख कोटी रुपयांपर्यंत विस्तारला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभागही वाढला आहे. 2019 मध्ये केवळ 38 दशलक्ष (3.8 कोटी) गुंतवणूकदार होते. आज आमच्याकडे सुमारे 145 दशलक्ष, म्हणजेच 14.5 कोटी, गुंतवणूकदार आहेत. गेले वर्ष खूप कठीण होते. तरीही या बाजारातून कर्ज आणि इक्विटीद्वारे 13 लाख कोटी रुपयांचा निधी उभारला. युरोपियन युनियनमध्ये असे देश आहेत जिथे संपूर्ण वर्षात एकही आयपीओ आला नाही. गेल्या वर्षी आमच्याकडे 366 आयपीओ आले, असे श्री. पांडे म्हणाले. म्युच्युअल फंड वाढले – म्युच्युअल फंड व्यवस्थापनाखालील मालमत्ता 2016 मधील 12 लाख कोटी रुपयांवरून एप्रिल 2026 अखेरपर्यंत जवळपास 82 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. एप्रिल 2016 मध्ये जवळपास 3,000 कोटी रुपये असलेला मासिक सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा ओघ, एप्रिल 2026 मध्ये 10 पटीने वाढून 31,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे, असे सांगून त्यांनी भारताच्या आर्थिक बाजाराची मजबुती अधोरेखित केली.