मुंबई : अमेरिकन शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडेनबर्गने अदाणी ग्रुपवर लावलेले आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत, असे स्पष्ट करत सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने गुरुवारी हिंडेनबर्ग प्रकरणात अदाणी ग्रुपला क्लीन चिट दिली. सेबीने अंतिम आदेशात म्हटले की, हिंडेनबर्गने अदाणी ग्रुपविरुद्ध केलेले इनसायडर ट्रेडिंगचे आरोप सिद्ध झाले नाहीत. तसेच संबंधित व्यवहारांमध्ये कोणतीही अनियमितता आढळली नाही. यामुळे अदाणी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदाणी, त्यांचे भाऊ राजेश अदाणी, अदाणी पोर्ट्स, अदाणी पॉवर आणि अॅडिकॉर्प एंटरप्रायझेस यांना दोषमुक्त करण्यात येत आहे. दरम्यान, गतवर्षी हिंडेनबर्ग रिसर्च, नॅट अँडरसन आणि मॉरिशस-आधारित परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार मार्क किंग्डन यांच्या संस्थांना सेबीने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यानंतर नॅट अँडरसन यांनी हिंडेनबर्ग बंद करण्याची घोषणा केली. दुसरीकडे अदाणी समूहाने नेहमीच हिंडेनबर्ग रिसर्चचे आरोप फेटाळले आहेत.