बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांवरून हाणामारी; 50 विद्यार्थी जखमी

ढाका : बांगलादेशामध्ये सरकारी नोकऱ्यांच्या मुद्यावरून सरकार धार्जिण्या विद्यार्थी संघटना आणि अन्य विद्यार्थी संघटनांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. रात्रभर झालेल्या या संघर्षाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आणि लाठीमार देखील करावा लागला. यामुळे डझनभर विद्यार्थी कार्यकर्ते जखमी झाले आहेत. राजधानी ढाक्याजवळच्या विद्यापिठाच्या आवारात हा प्रकार घडला. मंगळवारी सकाळी सवार भागातल्या जहांगीर नगर विद्यापिठामध्ये या हिंसाचाराला सुरुवात झाली.
१९७१ सालच्या बांगलादेशच्या स्वातंत्र्युद्धामध्ये भाग घेतलेल्यांच्या नातेवाईकांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये असलेला ३० टक्के जागांचा राखीव कोटा रद्द करावा या मागणीसाठी काही विद्यार्थी संघटनांनी आंदोलन सुरू केले होते. राखीव कोटाचा निकष पक्षपाती असून गुणवत्तेच्या आधारावर नोकऱ्या दिल्या जाव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. तर या राखीव जागांचा लाभ केवळ पंतप्रधान शेख हसिना यांच्या निकटवर्तीयांनाच मिळत असल्याचा आरोपही केला जातो आहे. या आंदोलनावर काही मंत्र्यांनी टीका केली आहे. स्वातंत्र्य युद्धात बलिदान केलेल्यांना सर्वाधिक मान मिळायला हवा, असे पंतप्रधान शेख हसिना यांनी म्हटले आहे. राखीव कोट्याला विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मंगळवारी विद्यापिठाच्या आवारात कुलगुरूंच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने सुरू केली होती.
पंतप्रधान शेख हसिना यांच्या आवामी लीग पक्षाशी संबंधित बांगलादेश छात्र लीग या विद्यार्थी शाखेने या आंदोलनकर्त्यांना विरोध केला. त्यानंतर बाचाबाची होऊन हाणामारीला सुरुवात झाली. या संघर्षात आणि पोलिसांच्या लाठीमारात ५० विद्यार्थी आणि १५ पोलीस जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. या हिंसाचाराचे लोण ढाका विद्यापिठातही पोचले असून तेथे देखील असाच हिंसाचार झाला. त्यात १०० विद्यार्थी जखमी झाले आहेत. आंदोलक विद्यार्थ्यांनी रेल्वे आणि महामार्ग रोखण्याचाही प्रयत्न केला. संपूर्ण राजधानी परिसरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.





