डॉ. मेघश्री दळवी रोबॉट म्हटलं की, माणसासारखी एक मूर्ती पटकन डोळ्यासमोर उभी राहते. पण प्रत्यक्षात आधुनिक रोबॉट्स मात्र केवळ माणूस नव्हे तर अनेक वेगवेगळ्या प्राण्यांपासून स्फूर्ती घेत असतात. मधमाशी, मासे, ऑक्टोपस यांच्यासारख्या हालचाली करणारे रोबॉट्स आज अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. कधी खोल समुद्रात संशोधन करताना त्यांचा वापर होतो, तर कधी पृष्ठभाग घट्ट पकडून काम करताना पालीच्या पायांसारखे अवयव उपयोगी ठरतात.साप आणि सरड्यासारखे सरपटणारे प्राणी, कुत्रा-मांजरीसारखे चतुष्पाद प्राणी यांच्यावरून निरनिराळे रोबॉट्स तयार झालेले आहेत. मात्र पक्ष्यांवरून प्रेरणा घेतलेले रोबॉट्स फार थोडे आहेत. जर्मनीतील मॅक्स प्लांक इन्स्टिट्यूटमधले शास्त्रज्ञ अलेक्झांडर बार्डी-स्प्रोविट्झ यांनी आता एक वेगळा विचार मांडला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, दोन पायांवर चालणारा रोबॉट बनवायचा असेल तर आपण माणसाचे पाय आणि त्याच्या चालीचा विचार करतो. त्याऐवजी पक्षी दोन पायांवर तोल सांभाळत कसे चालतात यांच्यावरून रोबॉट्स घडवले तर ते अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतील. अलेक्झांडर यांनी पशुवैद्यकशास्त्रज्ञ मोनिका डेली यांच्यासोबत काम करून एक बर्ड-बॉट तयार केला आहे. त्यांचं हे संयुक्त संशोधन नुकतंच सायन्स रोबॉटिक्समध्ये प्रसिद्ध झालं आहे. पक्ष्यांच्या पायांच्या विशिष्ट रचनेमुळे ते कमीत कमी ऊर्जा वापरून चालू शकतात. हेच तत्त्व रोबॉट्समध्ये वापरलं तर सहजपणे तोल राखून चालताना कमीतकमी ऊर्जा खर्च होईल. पक्षी आपल्या मर्यादित क्षमतांचा खूप कौशल्याने वापर करून घेताना दिसतात. माणसाच्या शरीरात एकूण सहाशे स्नायू असतात तर तुलनेने पक्ष्यांच्या शरीरात दोनशेपेक्षा कमी. त्यामुळे स्नायू नियंत्रण सुकर होतं. शरीराच्या आकाराच्या साधारण मध्यावर पक्ष्यांचे पाय असल्याने तोल राखणंही सोपं होतं. पायांच्या बोटांनी फांदी पकडून बसताना बोटांची पकड अगदी घट्ट असते. जमिनीवर उतरताना कमीत कमी आघात होईल यासाठी ते एका पायावर तोल राखून उतरू शकतात. या सर्व गोष्टी त्यांनी बर्ड-बॉटमध्ये घेतल्या आहेत. त्यामुळे त्याच्यातल्या मोटर्सची संख्या कमी होऊन कार्यक्षमता वाढली आहे. इतकंच नव्हे तर ज्या प्रकारे बदकापासून भल्या मोठ्या शहामृगापर्यंतचे पक्षी कार्यक्षमतेने चालू शकतात, त्याच प्रकारे बर्ड-बॉटची रचना लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व आकाराच्या रोबॉट्ससाठी सहज वापरता येईल. इतर तज्ज्ञांनीही हा विचार उचलून धरला आहे. आज दहा हजारांहूनही जास्त पक्ष्यांच्या प्रजाती दिसतात. त्या टिकून राहिल्या, अधिक विकसित झाल्या, या नैसर्गिक उत्क्रांतीचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे, यावर एकमत दिसतं आहे. बर्ड-बॉट उभा राहताना शून्य ऊर्जा वापरतो, तर चालायला सुरुवात करतानाही अत्यंत कमी ऊर्जेत वेग घेतो, याचं कौतुक होताना दिसत आहे. तेव्हा बहुधा लवकरच आजूबाजूला असे सहजतेने चालणारे रोबॉट्स दिसू शकतील.