– डॉ. मेघश्री दळवी आपण नियमित वैद्यकीय चाचण्या करून आपलं आरोग्य राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करत असतो. याच धर्तीवर पृथ्वीचीही संपूर्ण चाचणी करून तिच्या आजच्या परिस्थितीचा आढावा घेणं सुरू आहे. संशोधकांचे अनेक गट आता पृथ्वीच्या आरोग्याचं सर्वांगीण मूल्यमापन करत आहेत. त्यावरून येत्या दहा ते तीस वर्षांत आपल्या आयुष्यावर कोणते मोठे परिणाम दिसून येतील याचा अंदाज बांधत आहेत. आणि त्यातला धोका कमी करण्याचे मार्ग शोधत आहेत. त्यातला एक गट आहे अर्थ कमिशन. त्यांचा ताजा अहवाल नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या अभ्यासात सात पर्यावरणीय मुद्द्यांवर वसुंधरेचं आरोग्य तपासण्यात आलं. हवामान, वायूप्रदूषण, खतांचा अतिवापर आणि त्यातल्या फॉस्फरस आणि नायट्रोजनने पाणी दूषित होणे, भूजलपुरवठा, गोड्या पाण्याची उपलब्धता, नैसर्गिक राखलेला परिसर आणि एकूणच नैसर्गिक आणि मानव-निर्मित पर्यावरण. यापैकी सहा गोष्टींमध्ये आपण धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. फक्त वायू प्रदूषण हे जागतिक स्तरावर अजून धोकादायक मर्यादेच्या आत आहे. मात्र, स्थानिक पातळीवर ते कित्येकदा त्यापलीकडे जाताना दिसत आहे. एकूण चाळीस शास्त्रज्ञांच्या या गटाने प्रत्येक घटकासाठी मर्यादा ठरवल्या. त्यात स्थानिक परिसंस्था (इकोसिस्टम्स), नागरिक आणि दीर्घकालीन दृष्टीने पृथ्वीसाठी सुरक्षित काय आहे याचा सखोल अभ्यास केला. या गटातल्या एक संशोधक क्रिस्टी ए बी वॉशिंग्टन विद्यापीठात हवामान आणि सार्वजनिक आरोग्य या विषयाच्या प्राध्यापक आहेत. त्यांच्या मते पृथ्वीवरच्या बहुतांशी व्यवस्था धोका रेषेवर आहेत. जगात दोनतृतीयांश ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत खात्री देता येत नाही. त्यात काही प्रगत देशदेखील आहेत. हवामान बदलाने सगळीकडे अनिश्चितता आली आहे. हा अभ्यास करताना संशोधकांनी मूल्यामापन स्थानिक आणि जागतिक, दोन्ही पातळ्यांवर केलं. सोबत तरुण आणि वृद्ध नागरिक, प्रगत आणि विकसनशील देश, जागोजागीच्या परिसंस्था आणि त्यातल्या सजीवांच्या विविध प्रजाती, यांचा तुलनात्मक अभ्यास केला. पृथ्वीच्या अनारोग्याने कोणावर जास्त भार येतो आहे आणि त्यात न्याय (जस्टिस) आहे का, हा एक नवा पैलू या अभ्यासात आहे. विकसित देश अनेकदा आपल्या नागरिकांसाठी विकसनशील देशांच्या नागरिकांचे जीव धोक्यात घालतात. त्याचं सखोल मूल्यमापन या अभ्यासात झालं आहे. पृथ्वी आणि पर्यायाने आपण सगळे धोक्याच्या सीमारेषेवर उभे आहोत ही वस्तुस्थिती या संशोधनात अधोरेखित झाली आहे. या धोकारेषेवरून आपण परतू शकतो का? या गटातील तज्ज्ञांच्या मते अजूनही आपण आपल्या वसुंधरेला आजारातून वाचवू शकतो, निरोगी स्थितीत आणू शकतो. त्यासाठी उपाय नक्कीच आहेत. कोळसा आणि पेट्रोलचा कमीतकमी वापर करणे, जमिनीचा कस वाढवत रहाणे, नद्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे, हे मार्ग आपल्याला ठाऊक नाहीत असं नाही. पण दुर्दैवाने आपण ते मार्ग न पकडता, चुकीच्या दिशेने चाललो आहोत.