Pimpri : शाळांना यंदा तब्बल १२८ दिवस सुट्ट्या

भोसरी : शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्व शाळांना तब्बल १२८ दिवसांची सुट्टी मिळणार आहे. यामध्ये ५२ रविवार, ७६ सण-उत्सव व दोन मोठ्या सत्रांच्या (दिवाळी व उन्हाळी) सुट्ट्यांचा समावेश आहे. शालेय शिक्षण विभागाने नुकतीच अधिकृत यादी जाहीर केली असून, शाळा व्यवस्थापनाला वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
यंदा दिवाळी सुट्टी १६ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबरपर्यंत १० दिवसांची तर उन्हाळी सुट्टी २ मे ते १३ जूनपर्यंत एकूण ३८ दिवसांची असणार आहे. सण-उत्सवांच्या तारखांनुसार महिनानिहाय सुट्टीचे नियोजनही करण्यात आले आहे. स्थानिक सण किंवा यात्रा यांच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांमध्ये आवश्यक बदल केवळ गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतरच करता येणार आहेत.
प्रत्येक महिन्यात विविध सणांची यादी
जुलै ते एप्रिलदरम्यान आषाढी एकादशी, रक्षाबंधन, गणेश चतुर्थी, गौरी-गणपती विसर्जन, दसरा, दिवाळी, ख्रिसमस, मकर संक्रांत, महाशिवरात्र, होळी, गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, आंबेडकर जयंती आदी प्रमुख सणांनिमित्त सुट्ट्या ठरविण्यात आल्या आहेत.
उर्दू शाळांसाठी विशेष वेळापत्रक
उर्दू माध्यमाच्या शाळांसाठी नियमित वेळ सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ अशीच राहणार आहे. मात्र अर्ध्या वेळेच्या शाळा सकाळी ९ ते दुपारी १२.३० या वेळेत भरतील. रमजान महिन्यात या शाळांसाठी विशेष वेळ सकाळी ९ ते दुपारी २.३० पर्यंत ठेवण्यात येणार आहे.
गणेशोत्सवासाठी पाच ते सात दिवसांची विशेष सुट्टी
पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे स्थानिक परंपरेनुसार या कालावधीत शाळांना पाच ते सात दिवसांची विशेष सुट्टी दिली जाते.
सलग तीन दिवस सुट्टीवर नियंत्रण
राज्य सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार, सलग तीन दिवस शाळा बंद ठेवण्यास आता नियंत्रण आले आहे. स्थानिक सण, यात्रा यांसारख्या खास प्रसंगांशिवाय सलग तीन दिवस सुट्टी देणे अनुचित ठरवण्यात आले असून, अशा सुट्ट्यांसाठी मुख्याध्यापकांना गटशिक्षणाधिकाऱ्यांची पूर्वलिखित परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शाळा व्यवस्थापनाला नियोजनाचा संदेश
सुट्ट्यांमुळे शैक्षणिक वेळ प्रभावित होऊ नये, यासाठी यंदा शालेय शिक्षण विभागाने वेळापत्रक आणि सुट्ट्यांत स्पष्टता आणत शाळा व्यवस्थापन समित्यांना योग्य नियोजनाचे आवाहन केले आहे. वेळेत पाठयक्रम पूर्ण होणे आणि विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सुरळीत पार पडणे हाच यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.





