परीक्षा परिषदेचा शाळांना दणका

शुल्क न भरणे, चौकशी करणे, अनधिकृत शाळांचे प्रकरण
शिष्यवृत्ती परीक्षेतील काही विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले

पुणे – राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शुल्क न भरणाऱ्या 62 व चौकशीच्या कारणास्तव 27 विद्यार्थ्यांचे व 56 अनधिकृत शाळा व वर्गांचे निकाल राखून ठेवण्याची कारवाई महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात आली आहे. या कारवाईद्वारे शाळांना परिषदेने दणकाच दिला आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यांत दि.24 फेब्रुवारी रोजी इयत्ता पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. 8 लाख 37 हजार 540 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. या परीक्षेचा निकाल नुकताच परीक्षा परिषदेकडून लावण्यात आला आहे. परीक्षाच्या सर्व प्रक्रियेबाबतच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र काही शाळांकडून प्रक्रिया राबविताना चुका करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. परिषदेकडून याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून कारवाई सुरू करण्यात आली आहे.

काही शाळांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्यात आले आहेत. मात्र त्याचे शुल्कच अदा करण्यात आले नाहीत. मुदतीनंतर अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे विलंब शुल्कही भरण्यात आले नाहीत. काही नवीन विद्यार्थी प्रविष्ट करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत.

यात नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक 22 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नाशिकमधील 12, अमरावतीतील 4, लातूर, धुळे, ठाणे, मुंबई व जालनातील प्रत्येकी 2, औरंगाबाद, बीड, हिंगोली, गोंदिया, यवतमाळ, कोल्हापूर, पालघर, सोलापूर, जालना, अकोला, परभणी, जळगाव या जिल्ह्यातील प्रत्येक 1 याप्रमाणे विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत.

या विद्यार्थ्यांचे प्रत्येकी 1,340 रुपये प्रमाणे अति विशेष विलंब शुल्क भरणा केल्यानंतरच त्यांना निकाल प्राप्त करुन देण्यात येणार आहेत. चौकशीच्या कारणास्तव बुलढाण्यातील 24 व औरंगाबादमधील 3 विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत. इयत्ता आठवीच्या अनधिकृत शाळांमध्ये अहमदनगरच्या सर्वाधिक 5 शाळांचा समावेश आहे.
नाशिकच्या 4, ठाणे व जळगावमधील प्रत्येकी 3, पुणे व पालघरमधील प्रत्येकी 2, मुंबई, नंदूरबार, औरंगाबाद, बुलढाणा, नागपूर, नांदेडमधील प्रत्येक 1 शाळा यात समाविष्ट करण्यात आली आहे. दरम्यान, परीक्षा परिषदेच्या या पावलानंतर शाळांकडून काय भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.