School Gardening Competition: प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत उत्कृष्ट शालेय परसबाग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात गारवडी जिल्हा परिवद शाळेचा खटाव तालुक्यात प्रथम, तर सातारा जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीमुळे गारवडी गावचा नावलौकिक झाला आहे. दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खटाव तालुक्यातील गारवडी या छोट्याशा गावाने पुन्हा एकदा जिल्ह्याच्या नकाशावर आपले वेगळेपण अधोरेखित केले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गारवडी हिने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आयोजित उत्कृष्ट शालेय परसबाग स्पर्धा (२०२४-२५ व २०२५-२६) मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सलग दोन वर्षे पुरस्कार प्राप्त या स्पर्धेत खटाव तालुक्यात प्रथम क्रमांक तर सातारा जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावत शाळेने सलग दोन वर्षे पुरस्कार प्राप्त करण्याची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. सातारा जिल्हा परिषदेमार्फत आयोजित या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता. विशेष निवड समितीमार्फत बारकाईने मूल्यांकन करून विजेत्या शाळांची निवड करण्यात आली. School Gardening Competition: गारवडी हे गाव खटाव तालुक्यापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर, डोंगराळ व कोरड्या भागात वसलेले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही शाळेने परसबागेच्या माध्यमातून हिरवळ फुलवून आदर्श निर्माण केला आहे. मूल्यांकन करताना परसबागेचे नियोजन व व्यवस्थापन, सेंद्रिय खतांचा वापर, पाण्याचे योग्य नियोजन, ठिबक व मायक्रो सिंचन पद्धती, स्थानिक भाजीपाला लागवड, घनकचरा व्यवस्थापन, मायक्रोग्रीन आणि व्हर्टिकल गार्डन अशा विविध निकषांचा विचार करण्यात आला. School Gardening Competition विद्यार्थ्यांच्या आरोग्यालाही मोठा फायदा परसबागेत पिकवलेल्या ताज्या भाज्यांचा शालेय पोषण आहारात नियमित वापर केला जात असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यालाही मोठा फायदा होत आहे. मूल्यांकनासाठी आलेल्या पथकाने शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या एकजुटीचे विशेष कौतुक केले. या यशामागे मुख्याध्यापक अरुण आवळे तसेच डी. के. कर्णे, सुनिल जगदाळे, अजित फडतरे, अनिता जगताप, दीपाली जाधव, जयश्री कदम या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती, पालक, विद्यार्थी आणि समस्त गारवडी ग्रामस्थांचे सहकार्यही मोलाचे ठरले. School Gardening Competition: गारवडी शाळेची परसबाग ही केवळ झाडांची बाग नसून विद्यार्थ्यांच्या श्रमसंस्कारांची, निसर्गप्रेमाची आणि स्वावलंबनाची जिवंत प्रयोगशाळा ठरली आहे. दुष्काळी भागातही हिरवळ फुलवता येते, हे गारवडी शाळेने कृतीतून सिद्ध केले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल गारवडी शाळेचे खटाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आदरणीय योगेश कदम, पंचायत समिती सदस्या रेश्मा शेडगे, जिल्हा परिषद सदस्या लता कर्णे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादासाहेब पवार ,भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजी शेडगे, खटाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी आदरणीय सोनाली विभुते विस्तार अधिकारी संगीता गायकवाड, केंद्रप्रमुख संजय दिडके व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेचे अभिनंदन व कौतुक केले. हेही वाचा: Tejas Thackeray : मोठी बातमी! तेजस ठाकरेंची प्रकृती बिघडली; तातडीने रुग्णालयात दाखल, तीन दिवसांपासून उपचार सुरू