पुणे : शहरात आयोजित ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दि. १९ जानेवारी रोजी पुणे महानगरपालिकेच्या ठराविक क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा महत्त्वपूर्ण आदेश आज निर्गमित केला. १९ जानेवारी रोजी या स्पर्धेतील ‘प्रोलॉग रेस’ पार पडणार आहे. या शर्यतीसाठी शहरातील मध्यवर्ती भागातील फर्गसन कॉलेज रोड, गणेशखिंड रोड, जंगली महाराज रस्ता आणि या मुख्य रस्त्यांना जोडणारे सर्व उपमार्ग सकाळी ९:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. मोठ्या प्रमाणावर होणारी संभाव्य वाहतूक कोंडी आणि विद्यार्थ्यांच्या प्रवासात येणारे अडथळे लक्षात घेता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशानुसार छत्रपती शिवाजीनगर-घोले रोड, विश्रामबाग वाडा-कसबा, ढोले पाटील रोड, भवानी पेठ, औंध-बाणेर, कोथरुड-बावधन, सिंहगड रोड आणि वारजे-कर्वेनगर या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सर्व अंगणवाड्या, शासकीय व खासगी प्राथमिक-माध्यमिक शाळा, महाविद्यालये, तसेच व्यावसायिक शैक्षणिक संस्थांना ही सुट्टी लागू असेल. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदींनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, सर्व संबंधित संस्थांनी या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.