School Girls Accident – धनकवडी परिसरात भरधाव आणि बेदरकारपणे चालवलेल्या कारने दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात दोघी जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याचा आरोप असलेल्या चालकाविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्या दत्तात्रय पिलाने ( १७) आणि तिची मैत्रीण रितू चंद्रकांत हासूरे ( १७) या दोघी बुधवारी (दि.२९) सायंकाळी ८:४५ वाजता बालाजीनगर येथील पवार हॉस्पिटलसमोरून गणेश मंदिराकडे पायी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या कारने (क्र. एमएच १२ डीई ०११२) त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोघी रस्त्यावर पडल्या. आर्या पिलाने हिला डोक्याला, कानाला, कमरेला आणि पाठीला मार लागला तर रितू हासूरे हिच्या डोक्याला दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी दोघींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. कार चालक अकबर तांबोळी ( ३०, रा. धनकवडी) हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप जखमींनी केला आहे. अपघातावेळी त्याच्या तोंडाला दारूचा दुर्गंध येत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच, या चालकाने यापूर्वीही एलोरा पॅलेस परिसरात दोन ते तीन जणांना धडक देऊन जखमी केल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाल्याचेही सांगण्यात आले. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी संबंधित चालकाविरोधात बेदरकार वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे आणि निष्काळजीपणामुळे दुखापत केल्याचे कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार करत आहेत. हप्ते थकल्याने.. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनूसार आरोपीच्या भावाने कार कर्जावर घेतली आहे. हप्ते थकल्याने बँकेचे वसूली एजंट कार नेण्यासाठी आले होते, त्यांनी ती नेऊ नये म्हणून आरोपी ती वेगाने घेऊन जाण्याचा प्रयत्नात होता, यातच त्याचा कारवरील ताबा सुटून हा अपघात झाला.