Pimpri : रिक्षा, इको, मिनीडोअरची भरधाव शालेय दौड

नवी सांगवी : पिंपरी चिंचवड शहरातील शाळांमध्ये दररोज जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहतूक अवैधरित्या आणि धोकादायक पद्धतीने होत असल्याचे समोर आले आहे. ऑटोरिक्षा, मिनीडोअर, इको अशा खासगी वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक सर्रासपणे केली जात आहे. या वाहन चालकांकडून शासनाच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे. याकडे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक पोलीस विभागाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
२०११ मध्ये राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी नियमावली प्रसिद्ध केली आहे. तरी देखील पिंपरी चिंचवड शहरामध्ये तिची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. पिंपरी चिंचवड शहराच्या उपनगरातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यांची वाहतूक बेजबाबदार वाहनचालकांकडून गैरप्रकाराने केली जात आहे. काही शाळांनी अधिकृत वाहतूकदारांशी करार केले असले, तरी बहुतांश वाहतूक खासगी वाहनांमधूनच अनधिकृतरित्या होत आहे.
वाहतूक समित्या कागदापुरतीच
प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी समित्या असणे आवश्यक आहे. परंतु, अनेक शाळांमध्ये अशा समित्या अस्तित्वात नाहीत, किंवा असल्या तरी त्या सक्रिय नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षितपणे होत आहे का, यावर कोणतीही प्रभावी देखरेख नाही.
अधिकृत चालकांचेच प्रबोधन
काही नामांकित शाळांमध्ये प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी जाऊन शाळेच्या बसचे चालक आणि मदतनीस महिला यांचे प्रबोधन करतात. मात्र जे अनधिकृतपणे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतात त्यांच्यावर कारवाई आणि प्रबोधन याकडे दुर्लक्ष करतात.
वाहनचालक-पालकांचीही जबाबदारी
अनेक वाहनांत विद्यार्थ्यांना दाटीवाटीने बसवले जाते. बऱ्याच वेळा दप्तर बाहेर लटकलेले, शेजारी लहान मुले बसवलेली अशी दृश्ये पाहावयास मिळतात. पालकही अशा वाहनांमध्ये आपल्या पाल्यांना पाठवून अज्ञान किंवा दुर्लक्षातून जीवघेणा धोका पत्करत आहेत.
ऑटोरिक्षातून विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास परवानगी नाही. शाळांनी करारबद्ध बसेस किंवा व्हॅनचाच वापर करावा. नियमभंग करणाऱ्यांवर नक्कीच कारवाई होईल,” असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे. मात्र अनधिकृतपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे पोलिसांचा हा इशारा कितपत गांभीर्याने घेतात याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक ही केवळ सेवा नसून जबाबदारी आहे. शासनाने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन होणे अत्यावश्यक आहे, अन्यथा प्रशासनाला अपघात झाल्यावरच जाग येईल का, असा सवाल उपस्थित होतो.
चालकांचे प्रबोधन करण्यासाठी चिंचवड आणि चाकण येथे प्रशिक्षण घेण्यात आले. पूर्वीच्या काही ऑटोरिक्षा, मिनीडोअर, इको वाहनांना परवानगी दिली. मात्र पालकांनी अधिकृत वाहनतूनच विद्यार्थ्यांची वाहतूक शाळेत पाठवावे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून महिनाभरापासून कारवाई सुरू आहे. आम्ही कारवाईपेक्षा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला अधिक महत्व देतो. आरटीओकडून कारवाईसाठी वाहन थांबविल्यास विद्यार्थी घाबरतात. त्यामुळे विद्यार्थी सोडून आल्यावर अशा वाहनांवर कारवाई केली जाते.
संदेश चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक
नियमांची पायमल्ली सर्रासपणे सुरू
वाहतूक समित्या निष्क्रिय अवस्थेत
अनधिकृत वाहनांवर कारवाई नाही
विद्यार्थ्यांचे प्राण धोक्यात घालणे
पालकही दुर्लक्ष करत आहेत
प्रशासन अपघातानंतरच जागे होईल





