‘फी’ न भरल्यामुळे शाळेतून काढण्याची ‘धमकी’; 10वीच्या विद्यार्थीनीने गळफास घेऊन संपवली ‘जीवनयात्रा’

हैदराबाद – फी न भरल्यामुळे शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिल्याने दहावीच्या विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, मयत विद्यार्थीनी हैदराबाद येथील नेरमडेट भागात एका खासगी शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होती. फी भरण्यासाठी तिच्यावर शाळेतून वारंवार दबाव टाकला जात असे. तसेच शाळेतून काढून टाकण्याची धमकीही देत होते. शाळेतून होणाऱ्या त्रासाला कंटाळून 16 वर्षीय विद्यार्थीनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाॅकडाऊनमध्ये मयत विद्यार्थीनीच्या आई-वडिलांचा रोजगार गेला. त्यामुळे ते आर्थिक तंगीत होते. शाळेच्या 35 हजार रूपये फीपैकी 15 हजार रूपये जमा केले होते आणि शिल्लक रक्कम 20 फेब्रुवारीपर्यंत देण्याचे सांगितले होते. मात्र, तरिही पूर्ण फी जमा करेपर्यंत शाळेने तिचे शिक्षण थांबवले.
घटनास्थळी सुसाईड नोट मिळालेली नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.





