शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे अॅक्शन मोडमध्ये; शाळेला अचानक भेट

मालेगाव – नागपुरातील विधिमंडळ अधिवेशन पार पडल्यानंतर आता सर्वच मंत्र्यांनी नव्या खात्याचा पदभार स्वीकारत कामाला सुरुवात केली आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी मालेगाव तालुक्यातील देवारपाडे या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी बाकावर बसून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
तसेच शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या, अपेक्षा आणि शाळेच्या विकासासाठी लागणाऱ्या गरजांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
मालेगाव तालुक्यातील देवरपाडे गावातील शाळेत ते पोहचले. त्यांनी विद्यार्थ्यांकडून वाचन करुन घेतले. कविता म्हणून घेतल्या. मराठी आणि इंग्रजी कविता विद्यार्थ्यांनी म्हटल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शासनाचा मानस असून त्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवरुन उपाययोजना करण्यात येणार असल्याचे भुसे यांनी या दौऱ्यात सांगितले.

