जयपूर : राजस्थानमधील ३०० पेक्षा अधिक सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय भजनलाल शर्मा यांनी घेतला असून, बंद करण्यात येणार्या शाळा कमी विद्यार्थी संख्येमुळे इतर शाळांमध्ये विलिन करण्यात येणार आहे. या बंद करण्यात येणार्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या 25 पेक्षा कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी सरकारी शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढविण्यात अपयश आल्याचे मान्य केल्यामुळे हा निर्णय राजस्थान सरकारला घ्यावा लागला आहे. गेल्या काही काळापासून राजस्थानच्या सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने कमी होत होती. विद्यार्थी संख्या कायम राखण्यासाठी व वाढविण्यासाठी भजनलाल शर्मा सरकारकडून प्रयत्न देखील करण्यात आले होते. मात्र, विविध उपक्रम राबवून देखील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यात शिक्षणमंत्री मदन दिलावर यांना अपयश आले. त्यामुळे तब्बल 312 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थांना शेजारी असणार्या इतर शाळांमध्ये समाविष्ट करुन घेण्यात येणार आसल्याचे देखील राजस्थान सरकारने स्पष्ट केले. या निर्णयानंतर या बंद शाळांमध्ये असलेल्या शिक्षक व इतर कर्मचार्यांचे देखील स्थलांतर करण्यात येणार आहे. बंद करण्यात आलेल्या शाळांमध्ये काही शाळा अशा देखील आहेत, ज्या शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्याची नोंदणी करण्यात आलेली नाही. अशा शाळांच्या इमारती जिल्हाधिकाऱ्यांना सरकारी वापरासाठी दिल्या जातील. मानके पूर्ण न करताच मान्यता राजस्थान सरकारमधील शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढत असून सरकारी शाळांमधील विद्यार्थी संख्या घटत असल्याचे मान्य केले. तसेच या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, यासाठी दोन वर्षे सातत्याने प्रयत्न केल्याचे देखील सांगितले. दिलावर यांनी शाळा बंद करण्यासाठी तत्कालीन कॉंग्रेसचे सरकार जबाबदार असल्याचा दावा केला आहे. तत्कालीन कॉंग्रेस सरकाराने मानके पूर्ण न करतानाच शाळांना परवानगी दिली होती. तसेच कमी लोकसंख्या असलेल्या भागांमध्येही सरकारी शाळा उघडण्यात आल्या असल्याचा आरोप दिलावर यांनी केला आहे.